Khopoli News: खोपोली पालिकेत मोठा राजकीय ट्विस्ट! विरोधकच झाले शांत; सत्ताधाऱ्यांचे फावले की गुप्त सेटिंग?
Khopoli News: खोपोली नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्यात विरोधी पक्ष अपयशी; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर नागरिकांची तीव्र नाराजी.

– समाधान दिसले
Khopoli News – शहराचा विकास साधताना सत्ताधारी पक्षाच्या कारभारावर नियंत्रण ठेवणे आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे ही विरोधी पक्षाची महत्त्वाची भूमिका असते. मात्र खोपोली नगरपालिकेत विरोधी पक्षात असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून अपेक्षित आक्रमक भूमिका घेतली जात नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. स्वीकृत नगरसेवक सुनील पाटील,
गटनेते मंगेश दळवी यांच्यासह पक्षाच्या नगरसेवकांच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी विरोधकांकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. महायुतीमध्ये शिंदेसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आहेत.
मात्र खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने एकत्रितपणे निवडणूक लढवली. दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने परिवर्तन विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढवली. नगरपालिकेतील निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपने सत्ता स्थापन केली. भाजपला उपनगराध्यक्षपद देण्यात आले.
मात्र काही दिवसांपासून पालिकेच्या कारभारावरून भाजप आणि शिवसेनेत धुसफूस सुरू असल्याचे चित्र आहे. भाजपकडून वेळप्रसंगी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशाराही देण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, सत्तेत असलेला भाजप आक्रमक भूमिका घेत असताना विरोधात असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची भूमिका मात्र तुलनेने शांत असल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक सुनील पाटील यांनी लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पालिकेतील सत्ताधाऱ्यांना सभागृहात जाब विचारण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्यासाठी सुनील पाटील यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आल्याची चर्चा त्यावेळी होती.
मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ठोस भूमिका मांडण्याऐवजी ते सत्ताधारी गटाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र असल्याचा आरोप विरोधकांकडून नव्हे, तर नागरिकांकडूनच केला जात आहे. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसने मंगेश दळवी यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. दळवी यांना नगरपालिकेच्या कारभाराचा दोन ते तीन टर्मचा अनुभव असल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे सर्वसाधारण सभेत ते सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतील आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका मांडतील, अशी अपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांना होती. मात्र सर्वसाधारण सभेत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर अपेक्षित आवाज उठत नसल्याची टीका होत आहे. त्यामुळे एवढा अनुभव असलेल्या गटनेत्याची भूमिका नेमकी काय, असा सवाल उपस्थित होत आहे.






