Kho Kho World Cup 2025 : जानेवारीमध्ये रंगणार पहिली खो-खो विश्वकरंडक स्पर्धा….

Kho Kho World Cup 2025 – खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने पहिला खोखो विश्वकरंडक स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून ही स्पर्धा 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे घेण्यात येणार असल्याची माहिती फेडरेशनचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी दिली.
आज(दि.16) झालेल्या औपचारिक कार्यक्रमामध्ये विश्वकरंडक स्पर्धेचा अधिकृत लोगो, टॅगलाईनचे अनावरण करण्यात आले. स्पर्धेसाठी 24 देशांनी सहभागासाठी उत्सुकता दाखविली असून या स्पर्धेत दोन्ही विभागात 16 संघाचा समावेश होणार आहे.
Thrilled to be part of history in the making, the Logo launch ceremony for the first-ever Kho Kho World Cup, along with other esteemed dignitaries!
With 24 countries from 6 continents, this global event will proudly showcase Bharat’s sporting prowess on an international stage. pic.twitter.com/dEtNTMIRli
— Raksha Khadse (@khadseraksha) October 16, 2024
यावेळी बोलताना फेडरेशनचे अध्यक्ष सुधांशू मित्तल म्हणाले, खोखो हा देशाच्या मातीतील खेळ असून या खेळाला आम्ही मॅटवर आणल्याचा आम्हाला अभिमान आहे. खोखो हा आंतरराष्ट्रीय खेळ व्हावा, यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वाचे त्यांनी यावेळी आभार मानले. आम्ही अल्टिमेट खोखो लीगच्या माध्यमातून खेळाला चाहत्यांपर्यंत पोहचविण्यात यशस्वी ठरलो असून, पहिल्या खोखो विश्वकरंडक स्पर्धेच्या माध्यमातून या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी बोलताना सांगितले.
खो-खो हा खेळ आपल्या इतिहासाचा भाग असून सध्याच्या घडीला भारत अनेक स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देत आहे, असे क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या. यावेळी महाराष्ट्र व शेष भारत संघादरम्यान प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये महाराष्ट्र संघाने 26-24 असा विजय साकारला.





