Khed News: भीमा-भामा काठच्या गावांचा पाणीप्रश्न सुटणार? ३२ कोटींच्या निधीतून १५ बंधाऱ्यांची होणार दुरुस्ती

प्रभात वृत्तसेवा
राजगुरुनगर – खेड तालुक्यातील भीमा व भामा नदीवरील कोल्हापुरी बंधार्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेली पाणीगळती लवकरच थांबणार आहे. तालुक्यातील 15 बंधार्यांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी जलसंपदा विभागाने तब्बल 32 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून ही महत्त्वाची कामे लवकरच सुरू होणार आहेत.
या मंजुरीमुळे नदीकाठच्या गावांचा पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.खेड तालुक्यातील भीमा-भामा नदीवरील अनेक कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्यांची दुरवस्था झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत होती. ही स्थिती बदलण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभा अधिवेशनात ठोस आवाज उठवून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळत 15 बंधार्यांच्या उंबरठा, स्तंभ, संरक्षण भिंत व इतर दुरुस्तीची कामे करण्यास मान्यता मिळाली आहे.32 कोटी रुपये मंजूर करून खेड तालुक्याच्या सिंचन आणि पाणीपुरवठा व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल आमदार बाबाजी काळे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृष्णा खोरे मंडळाचे कार्यकारी संचालक गुणाळे,
पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता धुमाळ, कार्यकारी अभियंता जाधवर तसेच विभागातील सर्व अधिकारी-कर्मचार्यांचे आभार मानले आहेत.तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातील 13 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम टप्प्यात असून त्यासही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
पुढील टप्प्यात चासकमान, भामा-आसखेड येथील अंतर्गत बुडीत बंधारे, पुलं कम बंधारे तसेच चासकमान डाव्या कालव्याचे अस्तरीकरण व उजव्या कालव्याची दुरुस्तीची कामेही हाती घेतली जाणार असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले.
या गावांतील बंधारे होणार मजबूत
या कामांत मौजे भोंमाळे, दोंदे, राजगुरूनगर, खरपुडी, वाटेकरवाडी, निमगाव तांबे वस्ती, भिवेगाव तसेच मौजे शेलू, बोरदरा, कोरेगाव, पिंपरी, वाकी, शेलगाव, कोयाळी, सिद्धेगव्हाण या गावांतील कोल्हापुरी बंधार्यांचे गळती प्रतिबंधक व मजबुतीकरणाचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.





