Khed News – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लक्षणीय यश संपादन केल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी खेड तालुक्यातील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.खेड तालुक्यात जिल्हा परिषद गटात 5 तर पंचायत समितीवर 9 सदस्य विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित सदस्यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले.यावेळी उद्धव ठाकरे यांनी विजयी तसेच पराभूत उमेदवारांनाही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत पंचायत समितीवर पुन्हा एकदा निर्विवाद सत्ता मिळवली आहे. हा विश्वास कायम राखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. पक्षाच्या ध्येयधोरणांशी तडजोड न करता तळागाळातील लोकांपर्यंत विचार पोहोचवावा. जनतेच्या कामांना प्राधान्य देत संघटना अधिक बळकट करावी आणि सर्वांना सोबत घेऊन तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करावे. या भेटीदरम्यान युवानेते आमदार आदित्य ठाकरे, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, आमदार बाबाजी काळे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, जिल्हा महिला संघटिका विजया शिंदे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, युवा जिल्हाप्रमुख मृण्यमय काळे, तालुका महिला संघटिका उर्मिला सांडभोर, शैलेजा भोसले, नगरसेविका अनिता घोगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तनुजा घनवट, विनया मुंगसे, दिप्ती भोगाडे, विजयसिंह शिंदे, गणेश अरगडे तसेच पंचायत समिती सदस्य कविता राक्षे, दिलीप डुबे, माऊली ढेरंगे, विद्या मोहिते, प्रसाद घेनंद, मंगेश सावंत, सारिका गोगावले, रुपाली कांबळे, गौरी मुर्हे आदींसह शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीतील या यशामुळे खेड तालुक्यात शिवसेना पक्षाचे संघटन अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून येत असून आगामी काळात तालुक्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला.