Khed NCP News : खेड राष्ट्रवादीत मोठे बदल! तालुका कार्यकारिणी बरखास्त; नव्या नियुक्त्यांकडे लक्ष
Khed NCP News : खेड तालुका कार्यकारिणी बरखास्त करून नव्या नियुक्तींची प्रक्रिया सुरू; दिलीप मोहिते पाटलांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष अधिक सक्षम करण्यावर भर.

Khed NCP News – राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या खेड तालुक्यात पक्ष संघटनेत लवकरच मोठे बदल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांनी दिली. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनात्मक बळकटी देण्यासाठी तालुका स्तरावरील पदाधिकार्यांमध्ये फेरबदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नव्या तालुका अध्यक्ष तसेच आघाडी विभाग प्रमुखांच्या नियुक्तीचा निर्णय तातडीने अपेक्षित होता. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्याने ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर पक्षाचे प्रमुख नेते अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे निवड प्रक्रिया काही काळ स्थगित ठेवण्यात आली होती.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील संघटन पुन्हा सक्रिय करण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्षाला चांगले यश मिळाले असून खेड तालुक्यातही लक्षणीय कामगिरी झाली आहे.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेवर सुनिता शरद बुट्टे पाटील, गणेश बोत्रे आणि समीर काळूराम सुपे हे तीन सदस्य निवडून आले आहेत. तसेच पंचायत समितीच्या सहा जागांवर पक्षाने विजय मिळविला आहे. पंचायत समिती गटनेतेपदी शंकर रघुनाथ कावडे यांची सर्वानुमते निवड झाल्याची माहिती कोरेकर यांनी दिली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार खेड तालुका कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने नियुक्त्या करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच तालुका अध्यक्ष तसेच विविध आघाडी विभाग प्रमुखांची घोषणा केली जाणार आहे.
खेड तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात असला तरी अलीकडील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे संघटनात्मक पुनर्रचना करून पक्ष अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काही दिवसांत होणार्या नियुक्त्यांकडे संपूर्ण तालुक्याचे राजकीय लक्ष लागले आहे.
कोण होणार तालुका अध्यक्ष?
तालुका अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दिलीप मोहिते पाटील यांच्या शिफारशीवर सक्षम कार्यकर्त्याला संधी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या जिल्हा उपाध्यक्ष बाबा राक्षे, युवक तालुका अध्यक्ष जयसिंग दरेकर, माजी सभापती अंकुश राक्षे आदींची नावे चर्चेत आहेत.
इतर नियुक्त्यांवरही नजर
जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य पदासाठी राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अश्विनी पाचारणे आणि माजी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी राक्षे यांची नावे पुढे येत आहेत. तसेच कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदी संचालक अरुण चांभारे यांची निवड होण्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.






