Khed Accident : खाकीवर काळाचा घाला! बुलेट आणि रिक्षाच्या भीषण धडकेत पोलीस अंमलदाराचा मृत्यू
Khed Accident : महाळुंगे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले शशिकांत श्रीधर होले यांचा अपघाती मृत्यू; बुलेटने घरी परतत असताना रिक्षाने दिली जोरदार धडक.
Updated On:

Khed Accident – रिक्षा व बुलेट दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पोलीस अंमलदाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.28) रात्री घडली. शशिकांत श्रीधर होले (वय 37, रा. होलेवाडी, ता. खेड) असे मृत पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ते महाळुंगे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास होले हे बुलेटवरून होलेवाडी येथे घरी जात होते.
पाबळ रस्त्यावरील चव्हाण मळा, टाकळकरवाडी फाट्याजवळ टाकळकरवाडी कडून येणार्या रिक्षाने अचानक वळण घेतल्याने रिक्षा व बुलेट यांची जोरदार धडक झाली. या अपघातात होले रस्त्यावर डोक्यावर पडून गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचे बंधू श्रीकांत होले हेही पोलीस दलात कार्यरत आहेत.





