‘खवय्येगिरी’च पुणेकरांना मारक!

अस्वास्थ्यकारक खाण्यात पुणेकर अव्वल
पाहणी अहवालातील धक्कादायक निष्कर्ष
घरपोच पदार्थ मागवण्यातही पुणेकर आघाडीवर
पुणे – पुणेकर जसे “रसिक’ आहेत तसे ते “खवय्ये’ही आहेत, हे जगाच्या पाठीवर प्रसिद्ध आहे. मात्र, ही “खवय्येगिरी’ त्यांच्या स्वास्थ्याला घातक ठरत आहे. याचे कारण म्हणजे अस्वास्थ्यकारक खाण्यात पुणेकरांनी अव्वल स्थान मिळवले आहे. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संशोधन संस्थेने केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष काढला आहे. एवढेच नव्हे तर घरपोच पदार्थ मागवण्यातही पुणेकरच आघाडीवर आहेत.
हे सर्वेक्षण गोखले संस्थेच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेच्या सहायक परिचारिकांद्वारे 3,000 पेक्षा जास्त प्रौढ लोकांमध्ये केले. यामध्ये खाण्याच्या सवयी आणि सकस आहाराविषयीच्या समजुती याबद्दल अधिक जाणून घेतले, तसेच धोरणकर्त्यांनी सर्वांना चांगला आहार सहजपणे कशा पद्धतीने करून दिला पाहिजे यावर नागरिकांची मते घेतली.
सर्व्हेक्षणात खाद्यपदार्थ घरपोच मिळणे हे लोकप्रिय असल्याचे सिद्ध झाले. यासाठी बहुतांश नागरिक ऑनलाइन माध्यमांचा सरासरी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापर करतात. नागरिक जेव्हा घराबाहेर खाद्यपदार्थ खातात तेव्हा त्यांच्याद्वारे अस्वास्थ्यकारक पदार्थाचे सेवन केले जाते.
अन्न पदार्थांच्या निवडीमध्ये, निम्न सामाजिक-आर्थिक वर्गातील लोकांसाठी किंमत हा एक महत्त्वाचा भाग असून, सकस खाद्यपदार्थांचा पर्याय हा त्यांच्याकडून चौथा महत्त्वाचा भाग म्हणून विचारात घेतला जातो. उच्च सामाजिक-आर्थिक वर्गातील लोकांकरिता खाद्यपदार्थ निवडताना सकसतेचे पर्याय, दर्जा, चव आणि ब्रॅंड या पहिल्या चार पर्यायांमध्ये किंमत हा पर्याय कधीच येत नाही. सर्व गटांसाठी खाद्यपदार्थ सेंद्रीय आहेत का नाही हे अतिशय कमी महत्त्वाचे असल्याचे दिसून आले.
सकस पदार्थ मिळावेत अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे. याचे कारण म्हणजे मिळणारे खाद्यपदार्थ अधिकाधिक अस्वास्थ्यकारक होत चालल्याचे त्यांच्या लक्षात येत आहे. रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री बंद केली पाहिजे हे प्रयुक्त केलेल्या 60 टक्क्यांहून अधिकांना मान्य आहे, तर 70 टक्के नागरिकांना फळे आणि भाज्या या अधिक परवडण्यायोग्य दरात उपलब्ध हव्या आहेत, हेदेखील पाहणीतून पुढे आले आहे. गोखले संस्थेचे हे सर्वेक्षण “बर्मिंगहॅम इंडिया न्यूट्रिशन’ने इनिशिएटिव्हचा भाग म्हणून स्वीकारले गेले. हा उपक्रम इंग्लंडमधील बर्मिंगहॅम सिटी काउन्सिल आणि भारतातील पुणे महापालिका यांच्यातील “लर्निंग पार्टनरशिप’ असून, हे फूड फाउंडेशन आणि टाटा ट्रस्ट्स यांच्याद्वारे शक्य झाले.
घराबाहेर तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांसंदर्भात ध्येय धोरणे म्हणजेच अशा पदार्थांना चालना देणे जे उपलब्ध असतील आणि सुरक्षित, सकस, परवडण्यायोग्य असतील आणि अशाप्रकारे खरेदी केलेले असतील ज्यायोगे शाश्वत पर्यावरण आणि स्थानिक आर्थिक विकास याला पाठिंबा दिला जातो. याचसोबत बर्मिंगहॅममधील नागरिकांच्या घराबाहेर खाण्याच्या सवयींविषयीची माहिती मिळविण्यासाठी बर्मिंगहॅम सिटी काउन्सिलने एक सर्वेक्षण विकसित केले आहे जे सध्या ऑनलाइन केले जात आहे.
या सर्वेक्षणामधून असे सिद्ध होते की, भारतातील शहरांना या अवघड वळणावरून पुढे जाण्याची हीच संधी आहे. इंग्लंडमध्ये अधिक वजन, लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेहाचे प्रमाण आणि त्याच्याशी संबंधित आरोग्याच्या विषमता या एका आणीबाणीच्या टप्प्यावर येऊन पोहोचल्या आहेत, परंतु जर अधिकाऱ्यांनी आताच यामध्ये लक्ष घातले तर पुणे याचा मार्ग दाखवून देऊ शकेल आणि भारतामध्ये उदयास येणाऱ्या उपाययोजनांमधून इंग्लंडमधील नागरिकांनाही त्याचा नक्कीच उपयोग होईल.
– ऍना टायलॉर, कार्यकारी संचालिका, फूड फाउंडेशन
नागरिकांमध्ये पोषक आहाराच्या महत्त्वाविषयी जागरूकरता वाढविण्यासाठी आणि त्यांना आरोग्यदायी जीवन जगण्यास मदत करण्यासाठी पुणे महापालिका अनेक उपक्रम राबवित आहे. आम्ही या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा आढावा घेऊ आणि त्यांचा वापर पुढे जाऊन आमची धोरणे तयार करण्यासाठी करू.
– सौरभ राव, आयुक्त, महापालिका



