Khataw Man Sugar Factory : प्रभाकर घार्गेंचा धमाका! खटाव-माण कारखान्याबाबत केली मोठी घोषणा
Khataw Man Sugar Factory : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; साखरेसोबतच आसवणी प्रकल्पाच्या यशानंतर खटाव-माण कारखान्याची आगामी हंगामासाठी जय्यत तयारी.

Khataw Man Sugar Factory – पडळ येथील खटाव माण तालुका ॲग्रो प्रोसेसिंग प्रा. लि. या साखर कारखान्याचे नेटके नियोजन केल्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. कारखान्याच्या प्रगतीसाठी तोडणी कामगार व वाहतूकदार संघटना, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. यासाठी प्रतिवर्षी वाहतूक करार करण्यात करण्यात येतात व त्याचा फायदा सर्वांना होत असतो.
कारखान्याचे कार्य नियोजनानुसार करण्यात सुलभता येते. दुष्काळी भागातील हा साखर कारखाना प्रगतीच्या वाटेवर असून यंदा कारखान्याने सात लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दीष्ट समोर ठेवले आहे, अशी माहिती माजी आमदार व कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गें यांनी दिली. पडळ (ता. खटाव) येथे कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी व वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या करारपत्रांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्वेळी ते बोलत होते.
यावेळी कारखान्याचे को- चेअरमन आमदार मनोज घोरपडे, संचालक संग्राम घोरपडे, संचालक कृष्णात शेडगे, महेश घार्गे, तांत्रिक संचालक सनी क्षीरसागर, जनरल मॅनेजर काकासाहेब महाडिक, शेती अधिकारी किरण पवार, मुख्य लेखापाल अजित मोरे, मुख्य रसायनशास्त्रज्ञ गोरख कदम, आसवणी व्यवस्थापक नितीन शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
घार्गे म्हणाले, ‘गेल्या सात वर्षापासून सर्वांच्या सहकार्यातून कारखान्याची उभारणी करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी गळीत हंगामात सात लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त उसाचे गाळप केले जाणार असल्याचा विश्वास आहे.’आमदार घोरपडे म्हणाले, ‘प्रतिकूल परिस्थितीत लावलेल्या रोपट्यास आज चांगली फळे आली आहेत.
साखरेच्या उत्पादनाबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध बाबींचे नियोजन करण्यात येत असते. कारखान्याने सुरू केलेला आसवणी प्रकल्प उत्तमरीत्या सुरू आहे. योग्य नियोजन व कामगारांचे परिश्रमामुळे कारखान्याची प्रगती होत आहे. ’तसेच तोडणी वाहतूक यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर करार करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी पांडुरंग मिसाळ, प्रकाश काळे, प्रकाश खाडे, धनाजी अर्जुन, भाऊ पांढरे, पांडुरंग खरात, भिमाण्णा बरकडे आदींनी कारखान्याशी वाहतूकीचा करार करुन त्यांचे पूजन करण्यात आले. कार्यालयीन अधीक्षक मल्हारी नाकाडे यांनी सूत्रसंचालन केले.






