Lok Sabha Election 2024 : अमेठी, रायबरेलीचे उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार खर्गेंकडे

नवी दिल्ली – अमेठी आणि रायबरेली या मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार पक्षाने अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना दिले आहेत. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने हा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांना दोन जागांवर उमेदवारी देण्याची विनंती पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला केली आहे.
दोन जागांसाठी उमेदवार कधी जाहीर केले जातील आणि तेथून गांधी कुटुंबातील सदस्यांना उभे केले जाईल का, असे विचारले असता काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे म्हणाल्या, उमेदवार ठरवण्याचे अधिकार अध्यक्षांना दिलेले आहेत.
निवडणुका छुप्या पद्धतीने चालवल्या जात नाहीत. उमेदवारांची घोषणा केव्हा होईल ते सर्वांसमोर सर्व तपशीलासह जाहीर होईल. आमच्या पक्षात असे निर्णय दोन लोक बंद दाराआड घेत नाहीत, सीईसीने आपले मत मांडले आहे आणि त्यांच्या आणि अध्यक्षांच्या होकाराने उमेदवार निश्चित केले जातील, असे त्या म्हणाल्या.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अमेठी आणि रायबरेलीमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे.काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत युती केली असून राज्यात लोकसभेच्या १७ जागा लढवत आहेत.





