पुणे – महापालिकेत समाविष्ट होऊन काही दशके झाल्यानंतरही खराडी परिसराचा पाणीप्रश्न अद्याप सुटलेला नाही. या भागातील लोकप्रतिनिधी महापालिकेच्या माध्यमातून गेली ३० वर्षे हा पाणीप्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याने आगामी काळात भामा- आसखेड योजनेच्या माध्यमातून खराडी परिसराला पाणीपुरवठा करून या भागाला टॅंकरमुक्त करू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार सुनील टिंगरे यांनी या भागातील नागरिकांना दिला. आमदार टिंगरे यांच्या प्रचारार्थ खराडी भागात पदयात्रा काढण्यात आली. त्या वेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या वेळी बहुतांश नागरिकांकडून पाण्याच्या समस्येचे गाऱ्हाणे मांडत, हा प्रश्न कायमचा निकाली काढण्याची विनंती टिंगरे यांच्याकडे केली. त्याबाबत बोलताना टिंगरे म्हणाले, की २०१२ मध्ये मंजुरी मिळालेला भामा- आसखेड प्रकल्प अनेक कारणांमुळे रखडला होता. त्याबाबत पाठपुरावा करून ३८० कोटींचा हा प्रकल्प माझ्या कार्यकाळात पूर्ण झाला आहे. महापालिकेत अनेक वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या खराडी, चंदननगर भागांतील लोकप्रतिनिधींना पाणी देता आलेले नाही, तसेच खराडीला टँकरमुक्त करण्याची राजकीय इच्छाशक्ती कधीच दाखविता आली नाही. माझ्या पुढील कार्यकाळात धानोरी, विद्यानगरप्रमाणेच खराडी भागालाही टँकरमुक्त करणार असल्याचे आश्वासन आमदार टिंगरे यांनी दिले. पदयात्रेत सचिन सातपुते, शैलाजित बनसोडे, स्वप्नील पठारे, दर्शना पठारे, ज्योती जावळकर, अनिल नवले, गुलाब पठारे, सोमनाथ पठारे, विकास पठारे, किरण खैरे, आशा जगताप, स्वप्नील चव्हाण, शंकर संगम, समीर शेख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.