Kharadi Accident : दुर्दैवी! पिकअपच्या चाकाखाली सापडून दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू; पोलिसांनी चालकाला घेतलं ताब्यात.
Kharadi Accident : सायंकाळच्या वेळी घरासमोर खेळत असताना घडली घटना; वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी केली घटनास्थळाची पाहणी.

Kharadi Accident – वाहनाच्या चाकाखाली सापडून दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी परिसरात घडली. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मयूर अमर माळवे (वय २) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. या प्रकरणी पिकअप वाहन चालक राजू मगन ढोले (६६, रा. बाळकृष्ण अपार्टमेंट, ढोले-पाटील रस्ता) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पूनम अमर माळवे (२५, रा. ढोले पाटील वाडा, खराडी ) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम माळवे यांचा दाेन वर्षांचा मुलगा गुरुवारी (२९ जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास घरासमोरील माेकळ्या जागेत खेळत होता. मोकळ्या जागेत ढोले यांचा गोठा आहे. दूध वाहतूक करणारे पिकअप वाहन घेऊन ढोले तेथे आले होते.
त्यावेळी मोकळ्या जागेत खेळणारा मयूर वाहनाच्या चाकाखाली सापडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पिकअप वाहनचालक ढोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करीत आहेत.





