Khalapur News – कुंभिवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील धामणी गावात पिण्याच्या पाण्याची कमतरता, तुंबलेली गटारे तसेच इतर नागरी समस्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या समस्यांकडे ग्रामपंचायतीकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात असून, राजकीय मतभेदांमुळे कामांमध्ये टाळाटाळ होत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. धामणी गावात पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा होत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. रस्ते व इतर मूलभूत सुविधांबाबतही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आपल्या समस्या मांडल्या. तसेच पंचायत समिती कार्यालयात निवेदन देऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली. ग्रामस्थांशी चर्चा करताना सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी येत्या दहा दिवसांत समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा परिणाम तर या कामांवर होत नाही ना, अशीही चर्चा स्थानिक पातळीवर सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पंचायत समिती कार्यालयात निवेदन देताना नरेश मणेर, राजेंद्र लोते, कुंदन लोते, अजित कीरखंडे, संदीप साबळे, शेखर मोरे, चेतन चोगले, अमोल खाडे, रवींद्र लोते, कुपेश धुमाळ, यशवंत पिंगळे, ज्ञानेश्वर लोते, रामकृष्ण लोते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.