Khalapur News : पारदर्शक व सुलभ कारभारासाठी तांबाटी ग्रामपंचायतीने डिजिटल तंत्रज्ञानाचा (क्यूआर कोड आणि ऑनलाइन पोर्टल) वापर सरू केला आहे. बुधवार दि.२० मे रोजी क्यूआर कोडचे उद्घाटन करण्यात आले असून घरोघरी जाऊन घराच्या दरवाज्यावर लावण्यात आले आहे. नागरिकांना घरबसल्या घरपट्टी व पाणीपट्टी भरणे शक्य झाले असून, गावकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. तसेच करवसुलीचा ताण प्रशासनाचा वाचणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच अविनाश आमले यांनी दिली आहे. तांबाटी ग्रामपंचायत अनेक योजना तसेच उपक्रम राबविण्यात पुढे असतानाच कर वसुली वाढवण्यासाठी शक्कल लढवत लोटस एजन्सीच्या सहकार्यातून साॅफ्टवेयर तयार करण्यात आले आहे. क्यूआर कोड तयार करण्यात आले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणारी तांबाटी ही रायगड जिल्ह्यातील दुसरी तर खालापूर तालुक्यात पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. क्यूआर कोडचे उद्घाटन सरपंच अविनाश आमले, उपसरपंच अरूणा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सदस्य हरिभाऊ जाधव, संतोष दळवी यांच्या समवेत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी प्रशांत कदम यांनी माहिती देताना सांगितले की, तांबाटी ग्रामपंचायत नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. ग्रामपंचायतीत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीसाठी मोठी अडचण असते म्हणूनच क्यूआर कोड आणि ऑनलाइन पोर्टल सुरू केल्यामुळे करवसुलीसाठी मोठी मदत होणार आहे. नागरिकांनाही सर्व माहिती उपलब्ध होणार असून घराच्या उंबरठ्यावर क्यू आर कोड लावण्याचा शुभारंभ केला आहे. नागरिकांनी कर भरण्यासाठी अवाहन केले आहे. गावातील नागरिक कामानिमित्ताने बाहेर असतात. रविवार सुट्टी असल्यामुळे कर भरता येत नाही मात्र क्यू आर कोडमुळे घरबसल्या किंवा गावाच्या बाहेर राहणाऱ्या नागरिकांना फायदा होणार असल्याचे सरपंच अविनाश आमले यांनी सांगितले.