Khalapur News: सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा? स्मार्ट मीटर सक्तीविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पाहा काय घडलं?
Khalapur News: खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक, युवासेना आणि महिला आघाडीचे महावितरणला निवेदन.

Khalapur News – वीज वितरण मंडळाकडून ग्राहकांच्या संमतीशिवाय बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे, शहरात स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. शिवसेना खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक, युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी १८ जून रोजी महावितरण प्रशासनाला निवेदन सादर केले.
स्मार्ट मीटर योजनेमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर आर्थिक भार पडणार असून त्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होणार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी खालापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सुधाकर राठोड तसेच खालापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंगोडे यांनाही निवेदन देण्यात आले. स्मार्ट मीटर योजना रद्द करावी, अन्यथा आठ दिवसांनंतर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
या प्रसंगी एकनाथ पिंगळे, उमेश गावंड, वैशाली खैर, रमेश पाटील, अंकुर बामणे, संभाजी पाटील, नितीन पाटील, निलेश जुनगरे, विलास चाळके आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. स्मार्ट मीटर योजनेमुळे सर्वसामान्य ग्राहकांना नाहक भुर्दंड बसणार असल्याचा दावा करत शिवसेना ठाकरे गटाने या योजनेविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
“महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित आधीच कोलमडले आहे. अशा परिस्थितीत स्मार्ट मीटरची सक्ती करून नागरिकांवर आणखी एक आर्थिक ओझे टाकण्याचा प्रयत्न होत आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करून येत्या आठ दिवसांत ही योजना मागे घ्यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.”
– एकनाथ पिंगळे, तालुकाप्रमुख, शिवसेना, खालापूर




