khalapur Accident | भरधाव टेम्पोची भीषण धडक! एका तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

प्रभात वृत्तसेवा
खालापूर – कर्जत चौक रस्त्यावर भिलवले दरम्यान रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात संजय भिकू भस्मा (रा. पोखरवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलस्वारांना जोरदार धडक दिली. धडकेत संजय भस्मा यांचे डोके चिरडले गेले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यू पावलेले संजय भस्मा हे बाजारासाठी चौक येथे जात होते. त्यांच्या पश्चात दोन लहान मुले असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.घटनेनंतर टेम्पो चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना चौक पोलीस दूरक्षेत्र पथकाने त्याला ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक विशाल पवार, हवालदार घुले, हवालदार बागुल यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास खालापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे अपघातांना आमंत्रण..
कर्जत चौक रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. काही ठिकाणी काम पूर्ण होऊनही दिशादर्शक पट्टे, फलक बसवलेले नाहीत. अशा ठिकाणी भरधाव वाहनचालकांकडून वारंवार अपघात होत असून संजय भस्मा यांसारखे निरपराध जीव बळी पडत आहेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने रस्त्यावरील कामे पूर्ण करून सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.




