कोलकाता : पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात भाजपच्या शिष्टमंडळावर हल्ला झाला. या हल्ल्यात भाजप खासदार खगेन मुर्मू गंभीर जखमी झाले आहेत. भाजपचे पथक पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यात भाजप आमदार शंकर घोष यांचाही समावेश होता. हे दोन्ही भाजप नेते जलपाईगुडी येथे पुरानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. शंकर घोष यांनी आरोप केला की त्यांच्यावर आणि मालदा उत्तरचे खासदार खगेन मुर्मू यांच्यावर उत्तर बंगालमधील नागरकाटा येथे मदत साहित्य वाटप करताना हल्ला करण्यात आला. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, बंगालमध्ये टीएमसीचे जंगलराज सुरू आहे. उत्तर मालदा येथून दोन वेळा खासदार राहिलेले आणि एक आदरणीय आदिवासी नेते असलेले भाजप खासदार खगेन मुर्मू यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हल्ला केला. ते विनाशकारी पाऊस, पूर आणि भूस्खलनानंतर मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी जलपाईगुडीच्या डुअर्स प्रदेशातील नागरकाटा येथे जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांनी पुढे लिहिले, जेंव्हा ममता बॅनर्जी त्यांच्या कोलकाता कार्निव्हलमध्ये नाचत होत्या तेव्हा तृणमूल काँग्रेस आणि राज्य प्रशासन बेपत्ता होते. जे लोक प्रत्यक्षात लोकांना मदत करत होते, त्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर मदतकार्य केल्याबद्दल हल्ले होत आहेत. हे तृणमूल काँग्रेसचे बंगाल आहे, जिथे क्रूरता सर्वोच्च आहे आणि दयेला शिक्षा दिली जाते.