Khadki Murder Case : मी माझ्या बायकोचा मर्डर केलाय, या..” पोलिसांना सकाळी ८ वाजता आला खळबळजनक फोन
Khadki Murder Case : सकाळी ८ वाजता पोलीस कंट्रोल रूमला फोन आणि समोर हत्येचं दृश्य; खडकी पोलिसांकडून आरोपी पतीला बेड्या.

Khadki Murder Case – घरगुती वाद, नैराश्य आणि आर्थिक ताणतणावाच्या गुंत्यात अडकलेल्या एका कुटुंबाची कहाणी मंगळवारी पहाटे भीषण शेवटाकडे गेली. खडकी परिसरातील ओरियन कॉम्प्लेक्समध्ये पतीनेच झोपलेल्या पत्नीचे तोंड व नाक ब्लँकेटने दाबून खून केला. त्यानंतर स्वतःच पोलिसांना फोन करून मी माझ्या बायकोचा मर्डर केला आहे, अशी कबुली दिली.
पोलिसांनी सांगितले, की सकाळी सुमारे ८ वाजता नियंत्रण कक्षाकडून संदेश प्राप्त झाला. कॉलरने स्वतः घटनास्थळी उपस्थित असल्याचे सांगत पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मौजे चिखलवाडीतील ओरियन कॉम्प्लेक्स येथे धाव घेतली. दरवाजा उघडणाऱ्या व्यक्तीने मीच दिलीप नंबुरी कंडाथील…मी माझ्या बायकोचा मर्डर केला आहे, असे शांतपणे सांगितले.
पोलिसांना बेडरूममध्ये नेऊन त्याने पत्नी बिंदू (५३) यांचा मृतदेह दाखवला. प्राथमिक चौकशीत आरोपी दिलीप नंबुरी कंडाथील (५६) याने सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पत्नी झोपेत असताना तिच्या चेहऱ्यावर ब्लँकेट टाकून नाक व तोंड दाबले व गुदमरल्याने तिचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले.
आरोपीच्या म्हणण्यानुसार, पत्नी दीर्घकाळ नैराश्याच्या उपचाराखाली होती. ती पतीवर पहिल्या घटस्फोटित पत्नीस भेटत असल्याचा संशय घेत असे आणि त्यातून वारंवार वाद होत. त्यातच व्यवसायात नुकसान होऊन कर्जबाजारी झाल्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता. रोजच्या भांडणाला कंटाळून हे पाऊल उचलल्याची कबुली त्याने दिली.
घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालय पाठविण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेजाऱ्यांनीही दांपत्यामध्ये वारंवार वाद होत असल्याचे सांगितले. आरोपी रिअल इस्टेटचा व्यवसाय करतो. पहिली पत्नी आणि मुलगी त्याच्यापासून वेगळी राहात आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंग कदम यांनी सांगितले.




