प्रभात वृत्तसेवा मंचर – खडकी (गणेशवाडी) ता.आंबेगाव येथे रविवार, दि.२३ रोजी पहाटे सुमारे ५ वाजता पांडुरंग किसन पाटील यांच्या घरासमोरच्या गेटवरून बिबट्या उडी मारून थेट अंगणात शिरला. त्यावेळी अंगणात दोन कुत्रे होते.बिबट्या दिसताच ती कुत्री मोठ्याने भुंकू लागली आणि दोन्ही बाजूंनी त्याला सामोरे गेली. हा अनपेक्षित प्रतिकार पाहून बिबट्याने अक्षरशः पळ काढला. कुत्र्यांची प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, या भागात बिबट्याचे हे दर्शन नवे नाही. अंगणवाडी परिसरातही त्याची नियमित हालचाल दिसत असून महिलांमध्ये, मुलांमध्ये आणि सकाळी लवकर कामावर जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पांडुरंग पाटील यांच्या घराच्या अंगणात झालेली ही घटना धोक्याची घंटा असल्याने, संबंधित बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ पिंजरा लावावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वनविभागाकडे अनेक वेळा सूचना करूनही ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कोणतीही अनर्थकारक घटना घडू नये म्हणून वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी केले आहे.