Khadakwasla Dam: खडकवासला धरणातून मुठा नदीत 15730 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे – दोन दिवसांपासून खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. धरणाची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे आज बुधवारी रात्री 10 वाजतापासून मुठा नदी पात्रात 15730 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तत्पूर्वी 11143 क्युसेक्स विसर्ग सुरु होता. या विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर –
28 सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबई पुण्यासह राज्यात विविध भागात जोरदार पाऊस झाला. मुंबईत उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर खरबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली आहे.
शेती पिकांचं मोठ नुकसान –
राज्यात मागील दोन दिवसांपासून विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावत, धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेती पिकांचं मोठ नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे. पुढील पाच दिवस राज्यात कमी अधिक प्रमाणात सर्वच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
माॅन्सूनचा परतीचा प्रवास –
मॉन्सूनने २३ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू केला आहे. बुधवारी राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागासह पंजाब आणि हरियानाच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. फिरोजपूर, सिरसा, चुरू, अजमेर, माऊंट आबू, दीसा, सुरेंद्रनगर ते जुनागडपर्यंत मॉन्सूनची परतीची सीमा आहे.




