nagar | खा.लंकेंनी संगमनेरातून दूध उत्पादकांचे आंदोलन करावे

संगमनेर, (प्रतिनिधी) – दूध उत्पादक शेतकऱ्यांबद्दल एवढाच कळवळा असेल तर, खा.नीलेश लंके यांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघापासून करावी, असे थेटआव्हान भाजपा विधानसभा प्रमुख अमोल खताळ पाटील यांनी दिले आहे.
राज्यात महायुती सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपयाचे अनुदान देण्याची योजना सुरू करून त्याची अंमलबजावणी केली. संगमनेर तालुक्यातील सुमारे २३ हजार ३०४ शेतकऱ्यांना १६ कोटी १५ लाख ७७ हजार २५५ इतक्या रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाले. महाविकास आघाडी सरकारला जमले नाही ते महायुती सरकारने करून दाखवले.
पण या अनुदान योजनेत अडथळा आणण्याचे मोठे काम दूध संघाकडूनच झाले. एकीकडे दूधाला भाव नाही म्हणून सरकारच्या विरोधात ओरडणारे खा.लंके मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन दूध संघ चालविणाऱ्या माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरातांना सांगूही शकले नाहीत, हे दुर्दैव आहे.
सरकारकडून अपेक्षा व्यक्त करताना दूध संघांनीही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची मागणी खरे तर खा.लंके यांनी करायला हवी होती. परंतु, दूध उत्पादक शेतकऱ्यांवरचे बेगडी प्रेमच आता स्पष्ट होत आहे.
वास्तविक सरकारने पाच रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय करताना दूध संघांनी सुध्दा एक पाऊल पुढे टाकून मदत करणे गरजेचे होते. कारण एकीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाव नाही, अशी ओरड करणारेच दूध संघाचे चालक ग्राहकांना चढ्या भावाने दूधाची विक्री करतात. महाविकास आघाडीची अशी दुहेरी भूमिका कशी? असा सवाल अमोल खताळ पाटील यांनी व्यक्त केला.
केवळ शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळून त्यांच्या प्रश्नाचे राजकीय भांडवल करणाऱ्या खा.नीलेश लंके यांनी दूध धंद्याचा अभ्यास करून बोलावे. कारण संगमनेरात येऊन ज्यांचे कौतुक करता त्यांनी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यत किती आणि कोणती मदत केली याची माहिती घ्यायला हवी होती.
दूध संघांकडून होत असलेल्या अन्यायावर सुध्दा कधीतरी बोलावे.केवळ व्यक्तिद्वेषापोटी दूध अनुदानाचे राजकारण करण्यापेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बद्दल खरीच आत्मियता असेल तर खा.लंके यांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघापासून करावी, असे आव्हान पत्रकातून दिले आहे.





