KGF Actor Passes Away: KGF फेम या अभिनेत्याचे निधन, बेंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास

‘KGF Chapter 2’ च्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या चित्रपटात दिसणारे अभिनेते मोहन जुनेजा यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. या अभिनेत्याने आज म्हणजेच 7 मे रोजी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन जुनेजा हे दीर्घ आजाराशी झुंज देत होते. त्यांच्यावर बेंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र शनिवारी सकाळी मोहन यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. वृत्तानुसार, अभिनेत्याचे अंतिम संस्कार आजच होणार आहेत.

‘केजीएफ’ चित्रपटात भूमिका –
मोहन जुनेजा यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, हा अभिनेता चित्रपटांमधील त्याच्या शानदार कॉमेडीसाठी ओळखला जातो. त्यांनी अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण हिंदी पट्ट्यातील प्रेक्षक त्यांना ‘केजीएफ’ चित्रपटासाठी ओळखतात. मोहन जुनेजा ‘केजीएफ’च्या दोन्ही भागांमध्ये दिसले आहे. या चित्रपटात अभिनेत्याने पत्रकार आनंदीच्या इन्फॉर्मरची भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
या चित्रपटांमध्ये केले काम –
अभिनेते मोहन जुनेजा हा साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. ‘चेलता’ या चित्रपटातून ते चांगलेच प्रसिद्धीझोतात आले. या चित्रपटामुळे त्याला प्रेक्षकांमध्ये चांगलीच ओळख मिळाली. मोहन जुनेजा यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.





