Kevin Pietersen Mentor : २०२७ च्या विश्वचषकासाठी इंग्लंडची मोठी खेळी! दिग्गज केविन पीटरसनकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
Kevin Pietersen Mentor : इंग्लंड क्रिकेट बोर्डाने माजी खेळाडू केविन पीटरसनवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Kevin Pietersen Appointed England White Ball Mentor Ahead Of ODI World Cup 2027 : पुढील वर्षी खेळवल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी (ODI World Cup) इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंडने आपल्या संघाचा माजी स्फोटक फलंदाज आणि कर्णधार केविन पीटरसनकडे (Kevin Pietersen) व्हाईट-बॉल (मर्यादित षटकांचे) क्रिकेटसाठी ‘स्पेशालिस्ट मेंटॉर’ म्हणून मोठी जबाबदारी सोपवली आहे. पीटरसनच्या अफाट आंतरराष्ट्रीय अनुभवाचा थेट फायदा युवा खेळाडूंना करून देण्याचा इंग्लंडचा मुख्य उद्देश आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून सुरू होणार नवा कार्यकाळ; विश्वचषकावर असणार लक्ष –
पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर इंग्लंडचा संघ श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात इंग्लंड संघ बहुप्रतिक्षित एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून, याच दौऱ्यापासून पीटरसन आपल्या मेंटॉरपदाची सूत्रे हाती घेणार आहे. पुढील विश्वचषकाला अजून वर्षभराचा कालावधी शिल्लक असताना, आत्तापासूनच संघाची मानसिक आणि तांत्रिक तयारी भक्कम करण्याचे काम पीटरसनकडे सोपवण्यात आले आहे.
साउथ आफ्रिकेशी खास कनेक्शन; पीटरसन ठरणार हुकुमाचा एक्का!
🚨 BREAKING 🚨
Kevin Pietersen has been appointed Specialist Mentor to England Men’s white-ball teams.
KP will start with the upcoming SL series and will be involved through winter tours of Australia and South Africa, next summer’s Pakistan and New Zealand series, and the 2027… pic.twitter.com/jkupnZMunr
— Cricbuzz (@cricbuzz) September 7, 2026
आगामी एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे रंगणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केविन पीटरसनचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील पीटरमॅरिट्सबर्ग येथे झाला असल्याने तेथील खेळपट्ट्या आणि वातावरणाचा त्याला सखोल अभ्यास आहे. याशिवाय आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये राहिल्याने त्याचा कोचिंग अनुभवही दांडगा आहे. इंग्लंडच्या कोचिंग ताफ्यात मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम, मार्कस ट्रेसकोथिक, टीम साऊदी आणि जीतन पटेल यांच्यासोबत पीटरसन काम करताना दिसेल.
“२०१४ नंतर पुन्हा इंग्लंडच्या…”; पीटरसन आणि मॅक्युलमकडून आनंद व्यक्त!
या मोठ्या घोषणेनंतर आनंद व्यक्त करताना पीटरसन म्हणाला, “दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या विश्वचषकासाठी इंग्लंड बोर्डाने माझ्यावर विश्वास दाखवला याचा खूप आनंद आहे. २०१४ नंतर पुन्हा एकदा इंग्लंडच्या ड्रेसिंग रूमचा भाग होणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.” इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनीही पीटरसनचे संघात स्वागत करत त्याच्या आगमनामुळे इंग्लंडची बॅटिंग लाईनअप अधिक आक्रमक बनेल असा विश्वास व्यक्त केला.





