ठाणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने शरद पवार यांना उद्देशून पोस्ट लिहिली आहे. केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक आकाऊंटवर ही आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. शरद पवारांनी जवाहर राठोड यांच्या कवितेवरून केलेल्या वक्तव्यानंतर पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टिपण्णी असलेली ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. केतकीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर राष्ट्रवादी नेत्यांसह अनेकांनी केतकीला जोरदार फटकारले आहे. पोस्ट शेअर झाल्यानंतर केतकीला नवी मुंबई पोलिसांनी कळंबोली येथून ताब्यात घेतले. ठाणे गुन्हे शाखा तिचा शोध करत होती. आता ठाणे गुन्हे शाखेची टीम रवाना झाली असून तिला नवी मुंबई पोलिसांकडून ठाणे गुन्हे शाखा ताब्यात घेणार आहेत. सध्या कळंबोली इथे असलेल्या तिच्या मावशीच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नवी मुंबई पोलिसांकडून ताबा मिळाल्यानंतर केतकी हिला ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले जाणार आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. दरम्यान, केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी पुण्यातही दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रारी दाखल केली.