तिरुवनंतपुरम :- ट्रान्सजेंडर आता केरळमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेऊ शकतील. राज्यातील महाविद्यालयांमध्ये बीएस्सी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग कोर्सेसमध्ये त्यांच्यासाठी प्रत्येकी एक जागा राखीव ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशातील कोणत्याही राज्यात नर्सिंग कोर्समध्ये असे आरक्षण देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यावेळी बोलताना, राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या की, त्यांचे सरकार ट्रान्सजेंडर समुदायासाठी प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे. राज्य सरकार अशा समाजाच्या विकासासाठी काम करत आहे, ज्यांच्याबद्दल यापूर्वी लोक बोलायचेही नाही. ट्रान्सजेंडर्सना नर्सिंग क्षेत्रात आरक्षण देणे हे त्याचे ताजे उदाहरण आहे.
सरकारच्या या उपक्रमाचे ट्रान्सजेंडर समुदायाने कौतुक केले आहे. सरकारच्या या पावलामुळे समाजातील लोक पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वासाने अभ्यास करू शकतील. पूर्वी भेदभावामुळे विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडत असत, पण सरकार त्यांना आरक्षण देत असल्याने ते त्यांचा अभ्यास पूर्ण करू शकतील, असेही या समाज्याच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
2022 मध्ये जाहीर झालेल्या “नॅशनल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या अहवालात केरळ हे भारतातील सर्वात शिक्षित राज्य असल्याचे सांगण्यात आले आहे. केरळमधील सध्या 96% जनता साक्षर आहे.