Sreesanth Ban Lifted : भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला मोठा दिलासा! अखेर ‘ती’ ३ वर्षांची बंदी हटवली
Sreesanth Ban Lifted : भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतवर घातलेली तीन वर्षांची बंदी हटवण्यात आली आहे.

S Sreesanth Ban Lifted by Kerala Cricket Association : भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत याच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने (KCA) श्रीसंतवर घातलेली तीन वर्षांची बंदी (Ban) अधिकृतपणे हटवली आहे. या निर्णयामुळे गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या एका मोठ्या वादावर अखेर पडदा पडला आहे.
स्टार यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनच्या संघ निवडीवरून श्रीसंतने केरळ क्रिकेट असोसिएशनवर जाहीर टीका केली होती, ज्यानंतर असोसिएशनने त्याच्यावर ही कारवाई केली होती. १ जुलै रोजी झालेल्या ‘केसीए’च्या विशेष सर्वसाधारण सभेत (Special General Body Meeting) श्रीसंतने आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करत बिनशर्त माफी मागितल्यानंतर ही बंदी हटवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
संजू सॅमसनच्या मुद्द्यावरून झाला होता वाद –
हा संपूर्ण वाद गेल्या केरळ क्रिकेट लीग (KCL) हंगामापूर्वी सुरू झाला होता. केरळच्या विजय हजारे ट्रॉफी संघातून आणि भारताच्या २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून संजू सॅमसनला बाहेर ठेवण्यात आल्यानंतर श्रीसंत प्रचंड संतापला होता. त्याने या निवडीवरून ‘केसीए’वर जाहीरपणे कडाडून टीका केली होती. श्रीसंतच्या या विधानांमुळे असोसिएशनची प्रतिमा डागाळल्याचा ठपका ठेवत केसीएने त्याच्यावर तीन वर्षांची कडक बंदी लादली होती.
Thiruvananthapuram: The Kerala Cricket Association (KCA) has decided to revoke the three-year ban imposed on former India cricketer S. Sreesanth. Sreesanth was earlier suspended for three years over remarks made through visual and social media that the KCA said had brought… pic.twitter.com/IM09wiljWx
— ANI (@ANI) July 1, 2026
केसीएचे अधिकृत पत्रक; दिली कडक ताकीद
केसीएने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “श्रीसंतने असोसिएशनविरुद्ध केलेल्या विधानाबद्दल खेद व्यक्त करत बिनशर्त माफी मागितली आहे. त्यामुळे विशेष सर्वसाधारण सभेने सर्वसंमतीने त्याच्यावरील ३ वर्षांची बंदी उठवण्याचा निर्णय घेतला.” मात्र, असोसिएशनने त्याला कडक ताकीदही दिली असून, भविष्यात अशी वर्तणूक आढळल्यास अधिक कठोर शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
आता बंदी हटवल्यामुळे श्रीसंतला मोठा आर्थिक आणि व्यावसायिक दिलासा मिळाला आहे. तो आता केरळ क्रिकेट लीगमधील (KCL) ‘एरीज कोल्लम सेलर्स’ फ्रँचायझीचा सह-मालक (Co-owner) म्हणून आपली भूमिका पुन्हा सुरू ठेवण्यास मुक्त झाला आहे, ज्या भूमिकेपासून बॅनमुळे त्याला दूर करण्यात आले होते.





