Kenya protests : केनियामध्ये सरकारविरोधी आंदोलनादरम्यान हिंसाचार, १६ ठार

संतप्त निदर्शकांनी किमान दोन पोलिस ठाणी उद्ध्वस्त केली आहेत. बुधवारी देशभरातील ४७ पैकी २३ काउंटींमध्ये केनियातील लोकांनी पोलिसांच्या क्रौर्याविरोधात आणि चांगल्या प्रशासनाची मागणी करत निदर्शने केली. हजारो लोकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली आणि निदर्शनांचे रूपांतर केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठीच्या आंदोलनामध्ये झाले.
या हिंसक निदर्शनांमुळे राजधानी नैरोबीमध्ये उद्योगांचे नुकसान झाले आहे. अनेक दुकानांमधून उपयुक्त वस्तूंची लुटालूट करण्यात आली. या दुकानांच्या सीसीटीव्हीतल्या चित्रीकरणाच्या आधारे लुटारूंना जलद अटक करता येईल, असे केनियाचे गृहमंत्री किपचुंबा मुरकोमेन यांनी सांगितले.
निदर्शनांदरम्यान पोलिस अधिकाऱ्यांच्या वर्तनाचे त्यांनी समर्थन केले आणि सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे मंत्री मुरकोमेन यांनी गुरुवारी सांगितले. काल ज्याने अतिरेक केला असेल असा कोणताही पोलिस अधिकारी नाही. पोलिसांनी एक उठाव उधळून लावला आणि त्यांच्या जवळ बंदुका केवळ खेळण्यासाठी नाहीत, असेही ते म्हणाले.
केनियामध्ये वर्षभरापुर्वी करविरोधी आंदोलन झाले होते. त्या आंदोलनात आंदोलक संसदेमध्ये घुसले होते आणि हिंसाचारात किमान ६० जण ठार झाले होते. त्यातील २० अजूनही बेपत्ता आहेत. या आंदोलनाची आठवण सोशल मीडियावरून करून देण्यात आल्यानंतर बुधवारी नव्याने आंदोलन पेटले.





