Delhi Vidhansabha Election – वैयक्तिक लाभाच्या योजना यशाचे गमक ठरत असल्याचे मागील काही निवडणुकांमधून राजकीय पक्षांच्या चांगलेच लक्षात आले आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल याच योजनांचे फलित असल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही राज्यांमध्ये महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याची योजना येथील राज्य सरकारांनी राबवली होती. अशात, आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाकडून देखील याच मार्गावर पावले टाकण्यात आली आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये आम आदमी पक्षाने आघाडी घेतली आहे. राजधानी दिल्लीमध्ये ठिकठिकाणी अरविंद केजरीवाल यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर महिलांना देण्यात आले स्थान, आगामी निवडणुकांमध्ये ‘आप’ची मदार यावेळीही महिला मतदारांवरच असल्याचे अधोरेखित करते. महिलांचे मतदान ठरतंय गेम चेंजर | Delhi Vidhansabha Election महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना तर झारखंडमध्ये मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना गेमचेंजर ठरल्याचे दिसते. दोन्ही राज्यांमध्ये या योजना राबवणारे सरकार बहुमतासह सत्तेत आले आहे. अशातच, ‘आप’ने देखील याच मार्गाचा अवलंब करत पुन्हा सत्तेत येण्यासाठी पावले उचलली आहेत. 2024 च्या अर्थसंकल्पात दिल्ली सरकारने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना जाहीर केली होती, ज्यांतर्गत 18 ते 60 वयोगटातील कर न भरणा-या महिलांच्या खात्यात दरमहा 1,000 रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. संधी साधण्याचा प्रयत्न | Delhi Vidhansabha Election राजकीय जाणकारांच्या मते दिल्लीतील आप सरकार विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर, लाभार्थी महिलांच्या खात्यांमध्ये पहिला हप्ता लवकरात लवकर जमा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अरविंद केजरीवाल यांनी 22 नोव्हेंबर रोजी याबाबत भाष्य करताना, “सातवी रेवडी लवकरच येत आहे,” असे सांगितले होते. यापूर्वी दिल्लीतील सहा कल्याणकारी योजनांमध्ये या महिलांसाठीच्या योजनेची भर पडत आहे. यामध्ये मोफत वीज (200 युनिटपर्यंत), पाणीपुरवठा अनुदान, आदर्श शाळा, मोहल्ला क्लिनिक, महिलांसाठी मोफत बस प्रवास आणि ज्येष्ठांसाठी तीर्थयात्रा यांचा समावेश आहे. ‘रेवडी’ संस्कृती आपच्या मोफत योजनांना “रेवडी संस्कृती” म्हणून हिणवणाऱ्या भाजपने देखील अन्य राज्यांमध्ये याचीच कॉपी केल्याचे पाहायला मिळाले. अशातच केजरीवाल यांनी ‘रेवडी पे चर्चा’ मोहिम सुरू केली असून ते दिल्लीतील रहिवाशांशी थेट संवाद साधत आहेत. भाजप सत्तेत आल्यास दिल्ली सरकारच्या या योजना थांबवल्या जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी एका मुलाखतीत बोलताना, “आमच्या धोरणांची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की ज्याचा लाभ गरजू लोकांना मिळेल. आम्हाला अभिमान आहे की आम्ही रेवडी देतो आणि पुढेही देऊ.” असं वक्तव्य केलं होत. महिला मतदारांवर मदार 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांच्या मतांनी आम आदमी पक्षाला मोठा विजय मिळवून दिला. लोकनीती-CSDS च्या सर्वेक्षणानुसार, महिलांनी पुरुषांपेक्षा 11 टक्क्यांनी जास्त प्रमाणात आपला मतदान केले होते. आपला भाजपपेक्षा 25 टक्के जास्त समर्थन महिलांकडून मिळाले होते. अशातच आता, महैलांसाठी वैयक्तिक लाभाची योजना राबवून महिलांचा पाठिंबा पुन्हा मिळण्याची अपेक्षा आहे. याबाबत बोलताना एका आप नेत्याने सांगितले की, “महिलांच्या दैनंदिन समस्यांवर उपाय शोधण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. महिलांसाठी मोफत बस सेवा, मुलांच्या शिक्षणासाठी आदर्श शाळा, आणि घरपोच पाणीपुरवठा यामुळे महिलांमध्ये आमची विश्वासार्हता निर्माण झाली आहे.” निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय | Delhi Vidhansabha Election आम आदमी पक्षाने महिला मतदारांच्या भावनांना हात घालून आपने आपल्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणूक निकालांवर भाष्य करताना पक्षाच्या एका नेत्यानं म्हटलं, “महिलांच्या मतांचा प्रभाव दशकभरापासून आम्हाला ठाऊक आहे, आणि हे निकाल त्या गोष्टीला अधोरेखित करतात.”