लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयाचे केजरीवालांकडून स्वागत

नवी दिल्ली – देशातील लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला असून हा अतिशय योग्य निर्णय आहे असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली त्यानंतर केजरीवालांनी ही माहिती दिली. तथापी केंद्र सरकारकडून मात्र अजून तशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
केजरीवालांना या संबंधात आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की, आपण देशात लवकर लॉकडाऊन सुरू केल्याने प्रगत देशातील स्थितीपेक्षा आपली आजची स्थिती चांगली आहे.जर आपण हे लॉकडाऊन आत्ता थांबवले तर आत्तापर्यंत या लढ्यात आपण जे काही मिळवले आहे ते आपण गमाऊन बसू. आपले हे यश अधिक मजबूत करण्यासाठी आपल्याला लॉकडाऊनची मुदत वाढवणे गरजेचे आहे.
केजरीवालांनी पंतप्रधानांशी बोलतानाही हीच मागणी केली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले आहे की, बहुतेक राज्यांनी लॉकडाऊनची मुदत वाढवण्याची मागणी केल्याने केंद्र सरकार त्या मागणीचा विचार करीत आहे.





