Arvind Kejriwal : केजरीवाल यांचे भाजपला खुल्या चर्चेचे आव्हान

नवी दिल्ली : आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपला खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. आप आणि भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांमध्ये जाहीर चर्चा व्हायला हवी, अशी आग्रही भूमिका त्यांनी शनिवारी मांडली.
भाजपचे दिल्लीतील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून रमेश बिधुरी यांचे नाव निश्चित झाले असल्याचा दावा शुक्रवारी मुख्यमंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांनी केला. त्या दाव्याचा पुनरूच्चार केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केला. लवकरच भाजप मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा करेल. भाजपचा चेहरा बिधुरी असोत किंवा आणखी कुणी त्यांनी खुली चर्चा करावी, असे केजरीवाल म्हणाले.
त्यातून दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रमुख लढत आप आणि भाजपमध्येच होणार असल्याचे त्यांनी पुन्हा सूचित केल्याचे मानले जात आहे. दिल्लीतील कॉंग्रेस हा तिसरा महत्वाचा पक्ष आहे. मात्र, आप आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून त्यांच्यातच खरी लढत असल्याचे चित्र पुढे केले जात आहे. देशाच्या राजधानीतील मागील दोन विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेस पक्ष खातेही उघडू शकला नव्हता.





