Ambadas Danve : “देशाला कायम रांगेत ठेवणे हा मोदींचा ऐतिहासिक विक्रम”; अंबादास दानवेंची टीका
Ambadas Danve : "देशाला कायम रांगेत ठेवणे हा मोदींचा ऐतिहासिक विक्रम"; अंबादास दानवेंची टीका

Ambadas Danve : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा पंतप्रधानपदाचा सर्वाधिक कार्यकाळाचा विक्रम मोडला आहे. याबाबत बुधवारी एनडीएची एक मोठी बैठक होणार आहे.
या बैठकीत सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वाधिक काळ पदावर राहिलेले निर्वाचित पंतप्रधान बनल्याचा आनंद साजरा करण्यात येणार आहे. मात्र मोदींच्या या विक्रमावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. १२ वर्षांतील सर्वात मोठा ऐतिहासिक विक्रम म्हणजे देशाला कायम ‘रांगेत’ ठेवणे असे म्हणत दानवे यांनी मोदींवर टीका केली आहे.
अंबादास दानवे यांनी ट्वीट करत लिहिले की, “बँक खाते ते KYC च्या रांगा, नोटबंदीत स्वतःचेच पैसे काढण्याच्या रांगा, खते, पेट्रोल अन् ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी रांगा, लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी रांगा, कोव्हिड टेस्ट, व्हॅक्सिन ते लॉकडाऊनमध्ये घरी जाण्याच्या रांगा… ज्या देशात थोर विभूतींनी स्वाभिमान शिकवला, तिथे आज एका माणसाभोवती अंधभक्तीने रांगण्याची नवी स्पर्धा सुरू आहे. काहींना तर वाटतंय स्वातंत्र्य १२ वर्षांपूर्वीच मिळालंय” असे म्हणत त्यांनी भाजप नेत्यांना खोचक टोला लगावलाय.
१२ वर्षांतील सर्वात मोठा ऐतिहासिक विक्रम: देशाला कायम ‘रांगेत’ ठेवणे!
🔹बँक खाते ते KYC च्या रांगा
🔹नोटबंदीत स्वतःचेच पैसे काढण्याच्या रांगा
🔹खते, पेट्रोल अन् ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी रांगा
🔹लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी रांगा
🔹कोव्हिड टेस्ट, व्हॅक्सिन ते लॉकडाऊनमध्ये घरी…— Ambadas Danve (@iambadasdanve) June 10, 2026
मोदींनी नेहरूंचा विक्रम कसा मोडला?
२६ मे २०१४ रोजी मोदींनी प्रचंड मताधिक्याने पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. २०१९ मध्ये ते त्याहूनही मोठ्या जनादेशाने पुन्हा निवडून आले आणि त्याच वर्षी ३० मे रोजी त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला. त्यांचा सलग तिसरा कार्यकाळ ९ जून २०२४ रोजी सुरू झाला. १० जून रोजी मोदींनी १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर निवडून आलेल्या नेहरूंचा पंतप्रधान म्हणून ४,३९९ दिवसांचा विक्रम मोडला.
१९५२ पर्यंत निवडणुका झाल्या नसल्याने नेहरूंचा १९४७ ते १९५२ पर्यंतचा कार्यकाळ अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा कार्यकाळ १४ वर्षांचा होता, जो मोदींपेक्षा जास्त आहे परंतु त्यांचे पंतप्रधानपद सलग नव्हते. नेहरूंचा ४,३९९ दिवसांचा विक्रम मोडून नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वाधिक काळ पदावर राहिलेले निर्वाचित पंतप्रधान बनले आहेत.
हेही वाचा:





