Sunetra Pawar Facebook post : राज्यात पावसाने अक्षरश: कहर केला आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तर पावसाने रौद्र रुप घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या भागात मोठा पाऊस झाल्याने जनजीवन पूर्णताः विस्कळित झालं आहे. पावसामुळे नद्या, नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक नद्यांना पूर आला आहे. यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. ज्या भागात पूरस्थिती आहे, तिथे एनडीआरएफीच्या पथकाकडून बचाव मोहिम राबविली जात आहे. बळीराजाला देखील पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. बळीराजावर अस्मानी संकट कोसळलं असून, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. या राज्यातील परिस्थितीवर आणि ओढावलेल्या अस्मानी संकटावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अवाहन केलं आहे. माझ्या लातूर, सोलापूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर पूरग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनो व पदाधिकाऱ्यांनो, ही अतिवृष्टी आपल्या हातात नसली तरी, आपल्यातील माणुसकी जागी ठेवणं नक्कीच आपल्या हातात आहे, असा महत्वाचा संदेश सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. आज आपल्या भागात पावसाने थैमान घातले आहे. या संकटात आपल्या बळीराजाच्या डोळ्यादेखत त्याची मुकी जनावरं वाहून जात आहेत, ही बातमी ऐकून मन सुन्न झालं आहे. शेतकऱ्यासाठी त्याचं जनावर हे केवळ एक प्राणी नसतो, तर त्याच्या कुटुंबाचा सदस्य असतो. त्याचं हे नुकसान कधीही भरून न येणारं आहे. अशावेळी त्यांच्या डोळ्यांतील पाणी पुसणं, हे आपलं पहिलं कर्तव्य आहे, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत. या कठीण काळात, मी तुम्हा सर्वांना मनापासून विनंती करते की, चला, आपल्या गावागावात, प्रत्येक गल्ली-बोळात पोहोचूया. पाण्यात अडकलेल्या, मदतीची वाट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपण आधार बनूया. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी, जेवणाची आणि निवाऱ्याची सोय करण्यासाठी दिवस-रात्र एक करूया..! शासन आणि प्रशासन त्यांच्या पातळीवर काम करत आहेच, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कठीण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पण ही फक्त त्यांची जबाबदारी नाही, तर एक माणूस म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून आपलीही जबाबदारी आहे. आज आपल्या माणुसकीची खरी परीक्षा आहे, असंही त्यांनी या पोस्टमधून म्हटलं आहे. चला, एकजुटीने या संकटाचा सामना करूया. पक्ष, पद, आणि विचार या सगळ्याच्या पलीकडे जाऊन केवळ ‘माणूस’ म्हणून एकमेकांच्या पाठीशी उभे राहूया. आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी एकत्र येऊया. मला खात्री आहे, आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू…! पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. राज्यभरातून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच शेतकरी मदतीसाठी राज्य सरकारकडे मागणी करत आहेत. अशातच आज राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक होत आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तसे संकेत बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना दिले आहेत. मदत जाहीर पीक नुकसानीसाठी मदत म्हणून राज्यातील ३१.६४ लाख शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटी रूपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर कऱण्यात आल्याची माहिती आहे. या मदतीत प्रत्येक जिल्ह्यानुसार मदत जाहीर करण्यात आली आहे. हेही वाचा : “तुम्ही अल कायदापासून इथपर्यंत कसे आलात?” ; माजी अमेरिकन जनरलने सीरियाच्या अध्यक्षांना विचारला थेट प्रश्न