पुणे जिल्हा | राखीव भूखंड गावच्या विकासासाठी ठेवा

पिरंगुट, (वार्ताहर) – जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावात राखीव असलेल्या भूखंडाची पीएमआरडीए कडून विक्री केली जात आहे; परंतु हे भूखंड विक्री न करता गावच्या सार्वजनिक विकासासाठी राखीव ठेवावेत, अशी मागणी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकार्यांनी पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांची भेट घेतली. त्यावेळी कोंढरे यांनी ही मागणी केली.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या स्वीय सहाय्यक रश्मी कामतेकर, काका चव्हाण, भारती शेवाळे, कोंढूरचे सरपंच प्रमोद मरगळे आदी उपस्थित होते. गावातील विविध विकास कामांसाठी राखीव भूखंडांची गरज असते. विशेषतः पाण्याची टाकी मुलांसाठी क्रीडांगण, ग्रामपंचायत कार्यालय, सरकारी दवाखाना अशा विविध कारणांसाठी भूखंड गरजेचा असतो.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार, खासदार यांचेकडूनही या कामांसाठी निधी मिळत असतो; परंतु जागेअभावी हा निधी परत जातो. त्यामुळे गावामध्ये असलेले राखीव भूखंड सार्वजनिक विकासासाठी वापरले जावेत. पिरंगुट येथे एसटीपी लाइन आणि संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा. तसेच इ. जि. मा. 79 उरवडे ते पिरंगूट घाट रस्ता काँक्रिटीकरण करणे यासाठी निधी मिळावा, अशी मागणीही केली आहे.




