पुणे जिल्हा | केदारेश्वर बंधारा पाण्याखाली ; राजगुरूनगरात भीमा नदीला पूर

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – शहराला पाणीपुरवठा करणार्या भीमा नदीवरील केदारेश्वर बंधार्यावरून गुरुवारी (दि. 25) पाणी वाहिले. बंधार्याचे ढापे पावसाळ्या पूर्वी (मे महिना अखेरीस) काढण्याचे बंधन असताना नगरपरिषदेने ते काढले नाहीत त्यामुळे पूर आला तर बंधार्याला मोठा धोका होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. अनेकदा पुराचे पाणी नदीकाठच्या रस्ते, पाइपलाइन, भराव यांना नुकसानकारक ठरले आहे.
खेड तालुक्यात गुरुवारी रात्री आणि दिवसभर पावसाने जोरदार बॅटिंग केली. विशेष म्हणजे सह्याद्री पर्वतरांग असलेल्या भीमाशंकर खोर्यात धोधो पाऊस बरसत होता.
त्यामुळे भीमा नदी तसेच ओढे नाले पुराच्या पाण्याने भरून वाहात होते. चासकमान धरणाच्या पाण्यात त्यामुळे झपाट्याने वाढ होत होती. धरण भिंती खाली असलेल्या भागातील नाल्यांचे पाणी भीमा नदीपात्रातून वाहु लागल्यानंतर राजगुरूनगर परिसरात नदीला मोठा पूर आला.
या पुराच्या पाण्यामुळे नदीपात्रा लगतच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, आजच्या पावसाने खरीप पिकांची पण्याची तहान भागली असल्याचे मानले जात आहे. शिवाय नदी नाले ओसंडुन वाहु लागल्याने विहीर, बारव, बोरअवेल यांचे स्रोत वाढणार आहेत. शिवाय तळी, पाझर तलाव भरल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.





