Kaziah Liz Mejo: काझिया लिझ मेजो बनली ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’; आता जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व
Kaziah Liz Mejo: केरळची 19 वर्षीय काझिया लिझ मेजो हिने 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026'चा प्रतिष्ठित मुकुट पटकावला आहे.

Kaziah Liz Mejo: केरळची 19 वर्षीय काझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा प्रतिष्ठित मुकुट पटकावला आहे. राजस्थानमधील जयपूर याठिकाणी झालेल्या भव्य अंतिम सोहळ्यात ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2025’ची विजेती मानिका विश्वकर्मा हिने काझियाला मुकुट परिधान करून आपल्या उत्तराधिकारीकडे हा मान सोपवला.
या विजयासह काझियाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मोठी संधी मिळाली आहे. ती नोव्हेंबर 2026 मध्ये पोर्तो रिको येथे होणाऱ्या 75 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
स्पर्धेतील अंतिम ‘टॉप 3’मध्ये तमिळनाडूची वैष्णवी गणेश आणि गुजरातची अनुश्री सातवळेकर यांनी अनुक्रमे स्थान मिळवले. यंदाच्या स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यात देशभरातून निवड झालेल्या 52 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ऑडिशन्स, मुलाखती आणि विविध प्राथमिक फेऱ्यांनंतर या स्पर्धकांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.
#WATCH | Jaipur, Rajasthan | Grand Finale of Miss Universe India 2026 | Miss Universe India 2026 Winner Kaziah Liz Mejo says, “I feel so on top of the world. This is such an iconic moment, and the moment that I have worked for over three years now. I am so incredibly happy that I… pic.twitter.com/6IdSF1bpM3
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) August 24, 2026
या प्रतिष्ठित सोहळ्यासाठी परीक्षक मंडळाचे नेतृत्व भारताची पहिली मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन हिने केले. 1994 मध्ये सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकत भारतासाठी इतिहास रचला होता. परीक्षक मंडळात माजी मिस युनिव्हर्स इंडिया विजेत्या सेलिना जेटली, उर्वशी रौतेला आणि रिया सिंघा यांच्यासह इतर मान्यवरांचाही समावेश होता.
अंतिम पाच स्पर्धकांमध्ये तमिळनाडूची वैष्णवी गणेश, महाराष्ट्राची तेजस्विनी श्रीवास्तव, केरळची काझिया लिझ मेजो, गुजरातची अनुश्री सातवळेकर आणि उत्तराखंडची अनुभा वशिष्ठ यांचा समावेश होता.
विशेष म्हणजे, अंतिम फेरीतील 40 सेकंदांच्या समारोपाच्या भाषणाच्या आव्हानात काझियाने प्रभावी कामगिरी करत बाजी मारली आणि ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा मुकुट आपल्या नावावर केला. आता तिच्या या यशामुळे भारताच्या सौंदर्यस्पर्धेतील गौरवशाली वारशाला आंतरराष्ट्रीय मंचावर नवी झळाळी मिळण्याची अपेक्षा आहे.





