nagar | कवीजंग बाबांच्या यात्रोत्सवाची बैलगाडा शर्यतीने सांगता

नेवासा (प्रतिनिधी) – तालुक्यातील भानसहिवरा येथील कवीजंग बाबांच्या यात्रा उत्सवाची तालुक्यातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीने मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. या शर्यतीत वैजापूर येथील पंकज रजपूत यांच्या बैलगाड्याने बाजी मारली. या बैलगाडीला यात्रा कमिटीच्यावतीने ५१ हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
भानसहिवरा येथील हिंदू-मुस्लिमांच ऐक्याचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या कवीजंग बाबांचा यात्रा उत्सव म्हणजे परिसरातील व गावातील भाविकांची पर्वणी असते. या यात्रा उत्सवामध्ये परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक बाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी येत असतात. या यात्रा उत्सवाच्या काळात यात्रा कमिटीचे अध्यक्ष व गावचे सरपंच किशोर जोजार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या सहकार्याने विविध धार्मिक तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात कावड मिरवणूक संदल, छबीना, लोकनाट्य तमाशा आणि बैलगाडा शर्यत आदी प्रकारच्या कार्यक्रमाला गावातील बहुसंख्या भाविक व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. त्याचबरोबर येथील शोभेच्या दारूचा अतिषबाजीचा सामना या यात्रेचे मुख्य आकर्षण असते. हा सामना बघण्यासाठी पुरुषांसह महिलांची गर्दी लक्षणीय होती.
येथील बैलगाडा शर्यतीसाठी तालुक्यासह जिल्हाभरातून जवळपास दोनशेहून अधिक बैलगाडा धारक शर्यतीसाठी भानसहिवरा येथे दाखल झाले होते. बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आठ ते दहा हजार बैलगाडा शौकिनांची उपस्थिती होती.
हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष किशोर जोजार, दत्तात्रय काळे, बाबासाहेब ढवाण, संदिप तळपे, गणेश भुजबळ, नंदकुमार जाधव, प्रविण वंजारे, बाळासाहेब भणगे, कचरू भणगे, बबन भणगे,अनिल टाके, राजेंद्र नळकांडे, संजय तुपे, पवन जाधव, दीपक जाधव, शिमोन मकासरे,
पोपट शेकडे, जालिंदर गोरे, ज्ञानेश्वर पवार, अजिंक्य राऊत, सम्मेद मुथ्था,राजेंद्र ढवाण, संजय गोरे, महिंद्रा मकासरे, निलेश मकासरे, शरद भणगे, संजय जाधव, गणेश मुनोत, समाधान गुजर, मदन गुजर यांनी परिश्रम घेतले. बैलगाडा शर्यतीसाठी दानियल मकासरे,बाळासाहेब ढवाण,संतोष गुजर, सावळेराम कदम, किरण निपुंगे, संतोष मकासरे यांनी विशेष परिश्रम घेतले.




