‘कौन बनेगा करोडपती’ची २५ वर्ष पूर्ण; महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून खास फोटो शेअर; आठवणींना दिला उजाळा

Amitabh Bachchan : अत्यंत लोकप्रिय बनलेल्या केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपती या शोला तब्बल २५ वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक आणि शो चे होस्टिंग करणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी स्वतःचा एक अद्भुत फोटो शेअर केला आहे. त्यांनी या फोटोला एक खास कॅप्शनही दिले आहे. हा फोटो खूप लक्ष वेधून घेत आहे.
अमिताभ यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमधून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. २००० साली कौन बनेगा करोडपती हा शो प्रदर्शित झाला होता. आज ३ जुलै २०२५ रोजी जेव्हा मी या वर्षीच्या केबीसी सीझनची तयारी करीत होतो, तेव्हा मला केबीसी टीमने सांगितलं की, केबीसीचे ३ जुलै २००० रोजी पहिल्यांदा प्रसारण झाले होते… २५ वर्षे, केबीसीचे आयुष्य! असे कॅप्शन त्यांनी फोटोसोबत दिले आहे. यातून अमिताभ यांनी केबीसी शोसोबत असलेले आपले नाते किती घट्ट आहे, हे दाखवून दिले आहे.
कौन बनेगा करोडपती हा शो २००० साली सुरू करण्यात आला. जागतिक स्तरावरील लोकप्रिय शो ‘हू वॉन्ट्स टू बी अ मिलिनेयर’ची हा शो हिंदी आवृत्ती आहे. अमिताभ बच्चन यांनी जवळपास तिसरा सीजन सोडून इतर सर्वच सीजनचे होस्टिंग केले आहे, हिंदी सिनेसृष्टीतील महानायक म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची ओळख आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.
View this post on Instagram
बिग बींनी वयाच्या ८० वर्षांचा टप्पा ओलांडला असला तरी अजूनही ते अभिनयात सक्रिय आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठीही चाहते नेहमी उत्सुक असतात. सोशल मीडियावरही अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या मोठी असून ते नेहमी आपल्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.
हेही वाचा : सब-लेफ्टनंट आस्था पुनिया बनल्या नौदलाच्या पहिल्या महिला फायटर ; ‘हे’ घातक लढाऊ विमान उडवणार





