अहिल्यानगर – सुमारे पावणेचार कोटी रुपये खर्चून करण्यात आलेला टीव्ही सेंटर ते भिस्तबाग रस्त्याची कामानंतर अवघ्या काही महिन्यांत दुरवस्था झाली होती. मनपाने वारंवार नोटिसा बजावूनही ठेकेदाराने या रस्त्याची दुरुस्ती केली नाही. अखेर महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे व दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मात्र, महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या ठेकेदारावर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही.
सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वी महापालिकेने नगरोत्थान योजनेवरील व्याजाच्या पैशातून सुमारे पावणेचार कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे काम केले होते. कामानंतर काही महिन्यांतच हा रस्ता खराब झाला. याबाबत अनेकवेळा तक्रारीही करण्यात आल्या. रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, त्याची दखल अद्यापही घेण्यात आलेली नाही. महापालिकेने केवळ ठेकेदाराला नोटिसा बजावल्या आहेत. ठेकेदाराने त्याला प्रतिसाद न दिल्याने अखेर महापालिकेने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
दरम्यान, ठेकेदारावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. याबाबत आयुक्त यशवंत डांगे यांना विचारले असता लवकरच ठेकेदारावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.