Devendra Fadnavis : कस्पटे कुटुंबीयांची आरोपींवर मकोका कारवाईची मागणी; देवेंद्र फडणवीस म्हणाले… ‘ते त्या नियमात’….

Devendra Fadnavis : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील तिची सासू, नवरा आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली असून, गेल्या सात दिवसांपासून फरार असणारा तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बावधन पोलिसांनी अटकेची कारवाई करत पिता पुत्राला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी सापळा रचून अटकेची कारवाई केली आहे. आता या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आत्महत्या करायला प्रेरित करणे, या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. त्यांच्यावर कायद्याने जी काही कडक कारवाई करता येईल ती सर्व कारवाई केली जाईल. एकविसाव्या शतकात मुलींमध्ये आणि सुनांमध्ये फरक करणे हे चुकीचे आहे, अशा प्रकारची वागणूक देणे हे पाप आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी कस्पटे कुटुंबीयांनी मागणी केली आहे. याबाबत ते तुमची भेट घेणार असल्याचे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, मकोका लावण्याकरता काही नियम आहेत. त्या नियमात बसले तर मकोका लागू शकेल. पण, ते त्या नियमात बसेल की नाही, यासंदर्भात आज सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.
तसेच, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेच्या अटकेपूर्वी ते बिर्याणी खात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी त्यांना पकडलेले आहे. पोलिसांनी उचित कारवाई केली आहे. यापुढेही पोलीस कारवाई करतील. आता याला खूप फाटे फोडणे, हे अतिशय चुकीचे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मटणावर ताव मारतानाचा व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांचे अटके आधीचे जेवतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हे दोघे तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
गेल्या सात दिवसांपासून राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे हे दोघे फरार होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली होती. अखेर पोलिसांनी बाप आणि मुलला पकडण्यात यश आले आहे. या संपूर्ण अटकेच्या कारवाईबाबत पोलिस पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे समजते.





