Kashedi Ghat : कशेडी घाटात कारचा भीषण अपघात ! 5 जण जखमी

रायगड : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या इको कारचा अपघात होऊन कार पलटी झाली आहे. या भीषण अपघातात एकजण ठार झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी पहाटे ३.१५ वाजताच्या सुमारास घडली आहे. कार चालक लिंगप्पा कंटेपा पातारे (२८) इको कार घेऊन मुंबईकडून गोव्याकडे दिशेने जात होते.
दरम्यान कशेडी घाटात भोगाव हद्दीत भरधाव वेगाने जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरील कठड्यावर आदळून पलटी झाली. या अपघातात अनिल देविदास कांबळे (५५) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मोहन गोरोबा चव्हाण (४२), धनराज प्रभाकर मगर (४२), विकास शंकर चव्हाण (१८), नागनाथ मल्लिकार्जुन कांबळे (३५), निंगप्पा कंटप्पा पातारे (२८) हे पाच जण जखमी झाले आहेत. सर्व राहणार पुणे विभागातील आहेत.
या अपघाताची माहिती समजताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रवींद्र सर्णेकर, ठाणे अंमलदार सतीश कदम, पो. हा. नितेश कोंढाळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा अधिक तपास अंमलदार सतीश कदम हे करीत आहेत.





