कास भागातील प्रत्येक गावाचा कायापालट करणार

सातारा – कास पठार, शिवसागर जलाशय पर्यटनामुळे कास परिसरातील ग्रामस्थांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध झाले आहे. सातारा ते कास रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण झाले आणि कास ते महाबळेश्वर राजमार्गाचे काम मार्गी लावले आहे. याशिवाय शिवसागर जलाशयात वॉटर स्पोर्ट सुरु करण्यास परवानगी मिळवली आहे. त्यामुळे आगामी काळात या भागात पर्यटन वाढणार असून या भागातील व्यवसायवृद्धीसह रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. आगामी काळात कास परिसरातील प्रत्येक गावाचा कायापालट करू, असा शब्द आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून कोयना भूकंप निधीतून पेट्री (ता. सातारा) येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती आणि संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी 22 लाख रुपये मंजूर झाले. या कामांचे भूमिपूजन, जिल्हा क्रीडा विभागाकडून मिळालेल्या साहित्याचे लोकार्पण आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ या संयुक्त कार्यक्रमात आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, सदस्या विद्या देवरे, नगरसेवक धंनजय जांभळे, जिल्हा बॅंकेचे संचालक सुरेश सावंत, मधुकर मोरे, सोमनाथ जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “पर्यटनवाढीस चालना मिळून या भागातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
या भागात पर्यटन वाढीसह प्रत्येक गावात विविध प्रकारची कामे मार्गी लावली आहेत.’ कार्यक्रमास पेटेश्वर शिक्षण संस्थेचे अरुण शेडगे, पांडुरंग शेडगे, शंकरराव जांभळे, श्रीरंग माने, महादेव अहिरे, अंकुश मोरे, परशुराम वारागडे, श्रीरंग अहिरे, प्रदीप सपकाळ, सखाराम शिंदे यांच्यासह भागातील सर्व गावचे सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





