Kas Dam Satara: कास धरण तुडुंब…तरी सातार्यावर पाणी कपातीची टांगती तलवार का? वाचा काय आहे मूळ कारण
Kas Dam Satara: पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न केल्याचा फटका; टँकरच्या १०५ फेऱ्यांनंतरही सातारकरांना खाजगी टँकरसाठी मोजावे लागतायत हजारो रुपये.

Kas Dam Satara – कास धरणात समाधानकारक जलसाठा उपलब्ध असतानाही सातारा शहरातील नागरिकांना अजूनही पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे धरण भरल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असताना दुसरीकडे शहरातील अनेक भागांमध्ये अपुरा व अनियमित पाणीपुरवठा सुरू असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ही पाणी कपात कधी मागे घेतली जाणार असा प्रश्न सातारकर विचारत आहे .
सध्या कास धरणात 14.16 अब्ज दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत पाणीटंचाईचे संकट टळल्याचे चित्र असताना शहरातील सुमारे 17,500 नळजोडधारकांना अजूनही नियमित पाणी मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे-धरणात पाणी आहे, मग नळ कोरडे का? पालिकेकडून वितरण व्यवस्थेतील तांत्रिक अडचणींचा उल्लेख केला जात असला तरी नागरिकांच्या दृष्टीने हा प्रश्न केवळ तांत्रिक नसून नियोजनातील त्रुटींचा परिणाम आहे.
पावसाळ्यापूर्वीच जलवाहिन्यांची दुरुस्ती, गळती रोखणे आणि वितरण यंत्रणा सक्षम करणे अपेक्षित असताना त्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले का, असा सवाल उपस्थित होत आहे. सातार्याच्या पश्चिम भागामध्ये मागील आठवड्यात तब्बल चार दिवस सांबरवाडी येथे गळतीचे काम हाती घेण्यात आल्याने पाण्याचा ठणाणा झाला. टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरच्या तब्बल 105 फेर्या कराव्या लागल्या.
जिथे पालिकेचे टँकर पोहोचले नाहीत तेथे नागरिकांना बाराशे रुपये मोजून खाजगी टँकर मागवावा लागला. शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणी येणे, काही भागांत वेळापत्रक बिघडणे आणि नागरिकांना पाण्याची साठवणूक करावी लागणे ही परिस्थिती आजही कायम आहे. प्रशासनाने याबाबत स्पष्ट कालमर्यादा जाहीर न केल्याने नागरिकांमधील नाराजी वाढत आहे.
पाणी आहे… पण ते पोहोचते कुठे ?
कास धरणातील उपलब्ध जलसाठा 14.16 अब्ज दलघमी असून शहरातील एकूण नळ कनेक्शन सुमारे 17,500 आहेत. अंदाजे 12 ते 15 टक्के बोगस किंवा अनधिकृत नळजोड असल्याची शक्यता वतर्र्वली जात आहे. जलवाहिन्यांमधील गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत आहे. वॉटर ऑडिटसाठी डिजिटल मीटर प्रणालीचा अभाव आहे. एक्स्प्रेस लाइनवर अनधिकृत टॅप देण्याच्या तक्रारी, वारंवार होणार्या वीज खंडिततेमुळे विस्कळीत पाणीपुरवठा त्यामुळे उपनगरांना कृष्णा नदीचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.






