काही दिवसांपूर्वी बीड येथे ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली. या सभेत ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य करत स्व. गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस म्हणून धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला. भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात याची जोरदार चर्चा सुरू झाली. यावर आता धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांचं कौतुक करत त्यांना गोपीनाथ मुंडेंचे खरे राजकीय वारस असल्याचं म्हटलं आहे. करुणा मुंडे म्हणाल्या, “छगन भुजबळ यांनी 100 टक्के सत्य सांगितलं आहे. राजकारणात पोटचा वारसा नसतो, तर तो विचारांचा वारसा असतो. धनंजय मुंडे यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे.” पुढे त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांनी तळागाळात जाऊन स्वत:चं व्यक्तित्व निर्माण केलं, जे गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यशैलीशी मिळतं. “2009 ते 2019 या काळात मी त्यांचा हा संघर्ष जवळून पाहिला आहे,” असंही त्या म्हणाल्या. करुणा मुंडे यांनी धनंजय यांच्या कर्तृत्वाचं कौतुक करताना सांगितलं की, “गोपीनाथराव मुंडे साहेबांचे खरे राजकीय वारस धनंजय मुंडेच आहेत. मी त्यांची सून म्हणून हे सांगते. धनंजय यांनी आपलं कर्तव्य चोख बजावलं आहे.” त्यांनी पंकजा मुंडे यांच्या पराभवाचा उल्लेख करताना सांगितलं की, “पंकजा मुंडे यांच्या पराभवात भाजपाचा हात होता. त्यामुळे पंकजाताई डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. त्या कठीण काळात धनंजय यांनी भावाचं कर्तव्य पार पाडलं आणि पंकजा यांना आधार दिला. त्यानंतर दोघा बहीण-भावांनी एकत्र मंत्रिपदाची शपथ घेतली.” करुणा मुंडे यांनी धनंजय यांच्याशी कोणताही वैयक्तिक वाद नसल्याचं स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या, “माझा आणि धनंजय यांचा कोणताही वाद नाही. फक्त त्यांच्या वृत्तीशी माझा वाद आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “आज एक नवीन पर्व सुरू झालं आहे. मी माझी प्रॉपर्टी विकून, मंगळसूत्र गहाण ठेवून या संघर्षात सहभागी झाले होते. पंकजाताई आज जरी स्वत:ला वारसदार म्हणत असल्या, तरी गोपीनाथ मुंडे साहेबांचे खरे राजकीय वारस धनंजय मुंडेच आहेत.” या प्रतिक्रियेमुळे बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.