Karun Nair : ‘गौती भाई नही चाहते थे की…’, करुण नायरने आपल्या कामगिरीबद्दल खंत व्यक्त करताना केलं मोठं वक्तव्य

‘ईएसपीएनक्रिकइंफो’शी बोलताना नायर म्हणाला, “ओव्हल कसोटीत मला चांगली सुरुवात (57 धावा) मिळाली, पण ती शतकात बदलता आली नाही, याची खंत आहे. पहिल्या दिवशी संघ अडचणीत असताना टिकून राहणे महत्त्वाचे होते. मी थोडा घाबरलो होतो, पण मला आत्मविश्वासही वाटत होता. शतक करेन अशी अपेक्षा होती, पण ती पूर्ण झाली नाही.” कर्नाटकच्या या फलंदाजाने मान्य केले की, ही मालिका त्याच्यासाठी चढ-उतारांनी भरलेली होती. घरेलू क्रिकेटमध्ये मोठ्या धावा केल्यानंतरही राष्ट्रीय संघात त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
“भूतकाळ विसरून पुढे जायचंय”
करुण नायर म्हणाला, “मी खूप विचार केला, पण आता झालेल्या गोष्टी विसरून पुढील काही महिन्यांत काय करायचं यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. यापुढे कोणत्याही स्तरावर खेळताना मोठ्या प्रमाणात धावा करणं माझं लक्ष्य आहे.” त्याने कर्णधार शुबमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे कौतुक केले. या कठीण मालिकेत त्यांनी संघाला एकजुटीने पुढे नेल्याचे त्याने सांगितले.
हेही वाचा – Yash Dayal : यश दयालला मोठा धक्का! ‘या’ लीगमध्ये खेळण्यावर घातली बंदी, काय आहे कारण? जाणून घ्या
“शुबमन गिलचा उत्साह प्रेरणादायी” –
नायर म्हणाला, “शुबमनने सर्वांना एकत्र ठेवले आणि त्याने दाखवलेला उत्साह प्रेरणादायी होता. त्याने फलंदाज म्हणून स्वत:च्या कामगिरीसह संघाचे नेतृत्वही उत्तम केले. गौतम गंभीर यांनी सुरुवातीपासूनच स्पष्ट केले की, हा संघ बदलाच्या टप्प्यातून जाणारा नाही, तर हा एक उत्तम संघ आहे. त्यांनी आम्हाला आत्मविश्वासाने खेळण्यास सांगितले.”
“ऋषभ पंतची खेळी अविस्मरणीय” –
मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत दुखापतग्रस्त ऋषभ पंतने तुटलेल्या अंगठ्यासह केलेली फलंदाजी नायरसाठी अविस्मरणीय होती. तो म्हणाला, “ऋषभने तुटलेल्या अंगठ्यासह फलंदाजी करणे, हा मालिकेतील सर्वात संस्मरणीय क्षण होता. त्याचा हा दृष्टिकोन संघाचे खरे चरित्र दर्शवतो. तो किती महान खेळाडू आणि व्यक्ती आहे, हे यातून दिसून येते.” नायर आता या निराशाजनक दौऱ्याला विसरून पुढील आव्हानांसाठी सज्ज होत आहे.





