निवडणुकीत मोदींच्या विरोधात ‘करो या मरो…’; रमेश चेन्निथलांचे आवाहन

मुंबई – नरेंद्र मोदी आणि भाजप देशातील लोकशाही संपवण्याचे काम करत आहेत. मोदी पुन्हा सत्तेवर आले तर अनेकांना तुरुंगात जावे लागेल. कारण त्यांचा लोकशाही सिस्टीमवर कसलाच विश्वास नाही, त्यामुळे आपल्याला या निवडणुकीत करा किंवा मरा याच निर्धाराने लढा द्यावा लागेल, असे आवाहन कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केले आहे.
लोणावळा येथे पक्षाच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाल्यानंतर शनिवारी ते बोलत होते. या शिबिरात राज्याचे प्रमुख नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी फारच कमी वेळ असून, योग्य बूथ व्यवस्थापनासह शास्त्रोक्त पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल. महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा जिंकण्यासाठी इंडिया आघाडीने एकजुटीने काम केले पाहिजे. त्यासाठी काँग्रेसमध्ये शिस्त असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
नाना पटोले म्हणाले की, पक्षातील कोणीही पक्षाच्या व्यासपीठाच्या बाहेर पक्षाच्या संबंधात काहीही विपरीत बोलू नये. महाराष्ट्रात सध्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे. भाजप खोटे बोलत आहे आणि लोकांची फसवणूक करत आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्रच मोदींना सत्तेवर येण्यापासून रोखू शकतो असे ते म्हणाले.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की,राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा जनतेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे आणि आपण त्याचा लाभ उठवत एकत्रित प्रयत्न केला तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात लोकसभेच्या ३८ पेक्षा जास्त जागा जिंकू शकते, असे थोरात म्हणाले.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारने देशाचे अर्थकारण कसे बिघडवले आहे याची तपशीलवार माहिती दिली.ते म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग डॉ. मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारच्या काळात खूप अधिक होता त्या तुलनेत मोदींच्या कारकिर्दीत आर्थिक विकासाचा वेग खूपच कमी आहे.
यूपीएच्या दहा वर्षाच्या काळात अर्थव्यवस्थेचा विस्तार १८३ टक्क्यांनी झाला होता, तर मोदींच्या काळात तो केवळ १०३ टक्के होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी, अचानक लॉकडाऊन, शेतकऱ्यांविरुद्ध छेडलेले युद्ध आणि भ्रष्टाचार यामुळे अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होईल, असे भ्रामक स्वप्न दाखवले जात आहे.
पण त्यासाठी दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे, त्यासाठी देशाच्या आर्थिक विकासाची दर वाढ १० टक्के दराने झाली पाहिजे. पण सध्या केवळ ६ ते साडे सहा टक्के इतकाच विकास दर आहे, असे त्यांनी नमूद केले.





