Karnataka: आमदारांची मोठी सोय; अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दुपारी जेवणानंतर झोपण्यासाठी खास सुविधा…

बेंगळुरू – कर्नाटक विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी एक असामान्य पाऊल उचलण्यात आले आहे. आमदारांना जेवणानंतर झोप घेता येण्यासाठी राज्य विधिमंडळात १५ रिक्लाइनर भाड्याने घेणार असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष यू टी खादर यांनी सांगितले.
खादर म्हणाले, दुपारच्या जेवणानंतर सभागृहामध्ये आमदारांची उपस्थिती वाढवण्यासाठी हे एक चांगले पाऊल आहे. आमदार दुपारच्या जेवणानंतर विधानसभेतून बाहेर पडतात आणि बरेच जण दुपारच्या जेवणानंतर अधिवेशनात परत येत नाहीत. त्यामुळे ही सुविधा उपयुक्त ठरेल.
एका प्रख्यात माध्यमाने यासंदर्भातील बातमी दिली आहे. त्यानुसार यू टी खादर म्हणाले, आमदारांची गैरहजेरी रोखण्यासाठी, मी किमान १५ रिक्लाइनर्स भाड्याने घेण्याचा आणि ते विधानसभेच्या लॉबीमध्ये बसवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे आमदारांना एक ताजी झोप घेता येईल आणि सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येईल. तथापि, रिक्लाइनर्स भाड्याने घ्यावेत आणि खरेदी करू नयेत कारण विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर जर रिक्लाइनर्स वापरात येणार नाहीत व तो पैशांचा अपव्यय होईल. अधिवेशन संपल्यानंतर ते आवारातून काढून टाकले जातील असेही त्यांनी नमूद केले.
आमदारांना नाश्ता आणि जेवण देखील मोफत दिले जाण्याच्या पुढाकाराचेही त्यांनी संकेत दिले. खादर म्हणाले की जर आमदार नाश्त्याची वाट पाहत असतील, तर ते सभागृहात उशिरा पोहोचतात आणि दुपारच्या जेवणासाठी सभागृहातून बाहेर पडतत आणि त्यांना परत येण्यासाठी वेळ लागतो. पण मोफत नाश्ता आणि भोजनाच्या या उपक्रमामुळे आता असा प्रश्न उरणार नाही.
दरम्यान, विधानसभा सचिवालयाने २८ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान विधान सौध येथे एका पुस्तक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये पुस्तक प्रकाशन आणि पॅनेल चर्चा होणार आहेत. कर्नाटक विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होईल आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या ७ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.





