महाराष्ट्राला एक इंचही जागा न देण्याचा ठराव कर्नाटकाच्या विधिमंडळात मंजूर

बंगळुरू – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या विरोधात मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने एकमताने मंजूर केला आहे. कर्नाटकाच्या विधिमंडळात महाराष्ट्राला एकही इंचही जागा न देण्याचा ठराव आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माडला. त्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला. तसेच कर्नाटकाकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहिल्यास कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी महाराष्ट्राला दिला.
महाराष्ट्रातील नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले – बोम्मई
महाराष्ट्र-कर्नाटकप्रश्नी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आज पुन्हा एकदा बरगळले. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे बोम्मई म्हणाले. सभागृहाच्या आत आणि बाहेर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेत्यांच्या वक्तव्यांवरून असे वाटते की त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. याआधी राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या मुद्द्यावरून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, प्रयत्न सफल होऊ शकला नाही, असे ते म्हणाले.
तसेच हा मुद्दा रस्त्यावर सोडवायचा नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही हेच सांगितले. महाराष्ट्रानेच सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि नंतर लक्षात आले की हे प्रकरण खूपच कमकुवत आहे. त्यामुळे त्यांना अशी परिस्थिती निर्माण करून त्याचा फायदा घ्यायचा होता, तो यशस्वी होणार नसल्याचे ते म्हणाले.
तसेच कर्नाटक पोलीस हे राज्यावर हल्ला करणाऱ्यांना परत पाठवण्यासाठी सक्षम आहेत. याशिवाय चीनप्रमाणे कर्नाटकावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्याचे विधान त्यांची अपरिपक्वता दर्शवते. कर्नाटक भारतात आहे, याची त्यांना कदाचित माहिती नाही. भारतीय सैन्याने चीनी सैन्यासोबत केले तसे कर्नाटक पोलीस महाराष्ट्राच्या आंदोलकांना मागे हटवतील, असेही ते म्हणाले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक इंच जमीनही महाराष्ट्राला देणार नाही, असे म्हणत विधानसभेत ठराव मंजूर करण्याच्या सूचना बोम्मई यांनी दिल्या होत्या. यावरून त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले होते. आता त्यांनी थेट विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आता यावर काय प्रत्युत्तर देतात हे पाहावे लागेल.





