#INDvENG ODI : पदार्पणातच कृष्णा बनला हिरो

पुणे – इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाकडून पदार्पण करणारा कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा चार गडी बाद केल्यावर हिरो बनला.
कृष्णाने मंगळवारी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये महागडा ठरलेल्या कृष्णाने तिसरा स्पेल टाकताना मात्र, आपल्या चुका सुधारत इंग्लंडच्या चार फलंदाजांना बाद केले व सामना भारताच्या बाजूने झुकवला.
ही कामगिरी करतानाच त्याने भारतीय संघाचा माजी कसोटीपटू गोलंदाज नोएल डेव्हिड याचा 24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. 1997 साली वेस्ट इंडीजविरुद्ध पदार्पण करताना डेव्हिडने 21 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले होते. मंगळवारी झालेल्या सामन्यात कृष्णाने 8.1 षटके गोलंदाजी करताना 54 धावांत 4 बळी घेतले.
कृष्णाची सुरुवात निराशाजनक होती. इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टो व जेसन रॉय यांनी कृष्णाच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला होता. त्यावेळी पहिल्या व दुसऱ्या स्पेलमध्ये तो अत्यंत महागडा ठरला होता. त्याने टाकलेल्या पहिल्या तीन षटकांतच इंग्लंडच्या या फलंदाजांनी 37 धावा काढल्या होत्या.
मात्र, तिसरा स्पेल त्याने स्वप्नवत टाकला व इंग्लंडच्या फलंदाजीची वाताहत केली. त्याने जेसन रॉय, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्ज व टॉम कुरेनला बाद केले. कर्णधार विराट कोहलीने टाकलेला विश्वास कृष्णाने सार्थ ठरवला व आपले पदार्पण यशस्वी केले.




