Karnataka Election : ‘बाळासाहेबांच्या शापामुळे भाजपचा पराभव…’; ‘या’ बड्या नेत्याचा खोचक टोला

मुंबई – कर्नाटक विधानसभा निवडणुकांची उत्सुकता अवघ्या देशाला लागून राहिली होती. आज या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. कर्नाटकात काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली असल्याचे आता स्पष्ट झाले असून, भाजपाचा मोठा पराभव झाल्याचं दिसून येत आहे. हे कल हाती आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वातावरण बदलले असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, याच संदर्भात प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘बाळासाहेबांच्या शापामुळे भाजपचा पराभव झाल्याचे चंद्रकांत खैरे यांनी म्हंटलं आहे. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, “130 जागेच्या पुढे काँग्रेस जातेय तर 65 जागांवर भाजप आहे. या निवडणुकीच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजपचे बडे नेते प्रचार करण्यासाठी कर्नाटकात प्रचारासाठी गेले होते. मात्र जनतेने भाजपला साथ दिली नाही, यासाठी कर्नाटकच्या जनतेचे कौतुक करायला हवे. त्यामुळे दक्षिणेतून भाजप हद्दपार झाली आहे’. असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, ‘पंजाब, दिल्ली, पं, बंगाल, बिहार हातून गेलं आहे. शिवसेनेला सोडल्यानंतर भाजपची ही परिस्थिती झाली आहे. शिवसेना प्रमुखांना ज्यांनी धोका दिला त्यांचे हाल बेकार होतात, असे म्हणत बाळासाहेबांच्या शापामुळे भाजपचा पराभव झाल्याचे चंद्रकांत खैरे यांनी म्हणत भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाल्याचं दिसून येत असून काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवल्याचं चित्र आता स्पष्ट झाले आहे.





