Cricketer Scam : ‘या’ संघात तुझी निवड झाली…; ‘आयपीएल’च्या नावाखाली ‘या’ क्रिकेटपटूला २४ लाखांचा गंडा!

Karnataka Cricketer Scammed of Rs 24 Lakh : कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावातील १९ वर्षीय क्रिकेटपटू राकेश यदुरे याला २४ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारांनी त्याला आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघात निवड झाल्याचे सांगून २४ लाखा रुपयांची फसवणूक केली. मे २०२४ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या एका राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत राकेशने चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये त्याला इन्स्टाग्रामवर ‘सुशांत_श्रीवास्तव१’ या नावाने मेसेज आला, ज्यामध्ये त्याची राजस्थान रॉयल्ससाठी निवड झाल्याचे सांगितले.
कर्नाटकातील युवा खेळाडूला २४ लाखांचा गंडा –
फसवणूक करणाऱ्यांनी राकेशला फॉर्म भरण्यास आणि २,००० रुपये नोंदणी शुल्क म्हणून भरण्यास सांगितले. त्यानंतर, २२ डिसेंबर २०२४ ते १९ एप्रिल २०२५ या कालावधीत त्याने आणि त्याच्या कुटुंबाने एकूण २३,५३,५५० रुपये ऑनलाइन हस्तांतरित केले. फसवणूक करणाऱ्यांनी राकेशला सामन्यांसाठी ४०,००० ते ८ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेची हमी दिली आणि किट, जर्सी आणि फ्लाइट तिकिटे पाठवण्याचे आश्वासन दिले. मात्र, ३० एप्रिलपर्यंत काहीही न मिळाल्याने आणि आणखी ३ लाख रुपये मागितल्यानंतर राकेशला फसवणुकीची जाणीव झाली. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी सर्व संपर्क तोडले आणि त्याला ब्लॉक केले.
19-year-old cricketer Rakesh Yadure lost ₹24 lakh to cyber fraudsters posing as Rajasthan Royals selectors on Instagram 💸⚠️ Promised an IPL spot, they vanished after collecting the money. Police are investigating.#IPL #CyberCrime #CricketScam #RajasthanRoyals pic.twitter.com/DZjhgLypSI
— HK Chronicle (@HK_Chronicle_) May 23, 2025
राकेशचे वडील कर्नाटक राज्य परिवहन महामंडळात सुरक्षा रक्षक –
राकेशचे वडील, जे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळात सुरक्षा रक्षक आहेत, यांनी कुटुंबाच्या आर्थिक अडचणींना तोंड देत ही रक्कम जमा केली होती. बेळगावचे पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुंलेद यांनी सांगितले की, फसवणूक करणारे राजस्थानमधून कार्यरत असण्याची शक्यता आहे आणि सायबर क्राइम टीम तपासासाठी तिथे पाठवली जाईल. राकेशने पोलिसांना विनंती केली आहे की, त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी आणि इतरांना अशा फसवणुकीपासून वाचवण्यासाठी कारवाई करावी.
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : आयपीएल २०२५ गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशीचे समस्तीपूरमध्ये जंगी स्वागत, पाहा VIDEO
पोलिसांनी बेळगाव सीईएन (सायबर क्राइम, आर्थिक गुन्हे, नार्कोटिक्स) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे. पोलिसांनी क्रिकेटपटूंना आणि चाहत्यांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. “कोणत्याही व्यावसायिक क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. निवड केवळ प्रतिभेच्या आधारावर होते,” असे डॉ. गुंलेद यांनी सांगितले. या घटनेने क्रिकेट विश्वात खळबळ माजवली असून, तरुण खेळाडूंनी अशा बनावट ऑफर्सपासून सावध राहण्याची गरज आहे.





