बंगळुरू : कॉंग्रेसशासित कर्नाटकमधील नेतृत्वाविषयीचा सस्पेन्स कायम आहे. अशात कुठला निर्णय घ्यायचाच असेल; तर तो नववर्षातील फेब्रुवारीआधी व्हावा, असे साकडे त्या राज्याचे गृहमंत्री जी.परमेश्वर यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींना घातले आहे. कर्नाटकचा अर्थसंकल्प मार्चमध्ये मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीची तयारी महिनाभर आधी म्हणजे फेब्रुवारीपासून सुरू होईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडेच अर्थखात्याची धुरा आहे. त्याचा संदर्भ देऊन परमेश्वर पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाची शक्यता वर्तवणाऱ्या चर्चा सुरूच आहेत. कॉंग्रेसचे आमदार इक्बाल हुसेन त्याविषयीच्या भाकितावर ठाम असल्याने संबंधित चर्चांना आणखीच खतपाणी मिळाले आहे. उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार लवकरच मुख्यमंत्री बनतील. नववर्षात ६ किंवा ९ जानेवारीला ते सुत्रे हाती घेतील, असा दावा त्यांनी सोमवारी पुन्हा केला. मुख्यमंत्री पदावरून सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे कर्नाटक कॉंग्रेसमधील सुप्त संघर्ष संपलेला नाही, असे चित्र कायम आहे. त्यातून पेच संपवण्यासाठी कॉंग्रेस श्रेष्ठींकडून मुख्यमंत्री बदल करायचा की नाही याविषयी ठोस निर्णय होण्याचे संकेत मिळत आहेत. मधला मार्ग म्हणून मुख्यमंत्रिपदासाठी तिसरेच नाव पुढे केले जाऊ शकते, अशी कुजबूजही सुरू आहे. त्यामुळे त्या पदाचे संभाव्य दावेदार म्हणून इतर काही कॉंग्रेस नेत्यांचीही नावे घेतली जात आहेत. त्यामध्ये परमेश्वर यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेल्या भूमिकेचे महत्व वाढले आहे. तसेच, कर्नाटकच्या नेतृत्व बदलाविषयीचा चेंडू कॉंग्रेस श्रेष्ठींच्या कोर्टात गेला असल्याचेही पुन्हा अधोरेखित झाले आहे.